नरभक्षक वाघच ठरतोय 'स्मार्ट'; वनविभागाच्या मोहीमेला अपयश; अधिकारी, कर्मचाऱ्यांच समन्वयाचा अभाव

श्रीकांत पशेट्टीवार
Tuesday, 20 October 2020

दहा शेतकरी, शेतमजूर यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. 200 कर्मचारी ,160 कॅमेरे, दोन शूटर, डॉक्‍टर व त्यांच्या दिमतीला वन विभागातील वरिष्ठ अधिकारी असताना वाघ जेरबंद झाला नाही.

राजुरा (जि. चंद्रपूर)  ः मध्य चांदा वन विभागाअंतर्गत राजुरा, विरुर वनपरिक्षेत्रात नरभक्षी वाघ अजूनही वनविभागाच्या जाळ्यात आला नाही. शेतकरी, शेतमजूर यांच्या आंदोलनाने वनविभाग जागा झाला. त्यामुळे मागील आठ दिवसांत वेगवेगळे प्रयोग वनविभागाने केले. मात्र, या प्रयोगांना वाघोबा हुलकावणी देत फिरत आहेत. तब्बल नऊ महिन्यांपासून या वाघाला जेरबंद करण्यात अपयश आले.

दहा शेतकरी, शेतमजूर यांचा बळी घेणाऱ्या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. 200 कर्मचारी ,160 कॅमेरे, दोन शूटर, डॉक्‍टर व त्यांच्या दिमतीला वन विभागातील वरिष्ठ अधिकारी असताना वाघ जेरबंद झाला नाही. मागील आठ दिवसांत शेतकरी, शेतमजुरांच्या आक्रमकतेमुळे वनविभागाने नवनवीन प्रयोग केले. मात्र, वाघ वनविभागाच्या तावडीत आला नाही. 

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

मागील दोन आठवड्यांच्या वनविभागातील घटनाक्रमात अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. शेतकरी, शेतमजूर व लोकप्रतिनिधीने वाघाला जेरबंद करा किंवा ठार मारण्याची मागणी केली. स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी त्यांच्यावर जबाबदारी निश्‍चित करून निलंबित करा, पीडित कुटुंबातील सदस्यांना विभागात सामावून घ्या, यासह इतर मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे डोळे उघडले. 

स्थानिक पातळीवरील अधिकारी कामाला लागले. वाघाला जेरबंद करण्याची मोहीम मागील नऊ महिन्यांपासून सुरू आहे. या मोहिमेला शासनाने तीनदा मुदतवाढ दिली. तब्बल आठ ते दहा महिन्यांचा कालखंड लोटला. या कालावधीमध्ये वन विभागातील अधिकारी व तयार करण्यात आलेल्या पथक यांच्यात कुठे समन्वय नसल्याचे काही घटनातून पुढे आले आहे. त्यामुळे मागील नऊ महिन्यांच्या कालखंडात वन विभागाला वाघाला जेरबंद करता येऊ नये हे बाब मोहिमेतील सदस्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे. 

तब्बल नऊ महिन्यांपासून शॉर्पशुटर, डॉक्‍टर, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि 200 कर्मचारी या मोहिमेत सहभागी असताना नेमके काय साध्य केले हे वन विभागालाच माहीत नाही. या मोहिमेवर आतापर्यंत लाखो रुपये खर्च झाले. मात्र, अपयश लपविण्यासाठी वन विभाग वेगवेगळे कारण सांगत आहे.

सविस्तर वाचा - चाळीसचे फेडले ८५ लाख; तरी सावकार करायचा १३ लाखांची मागणी; त्रास असह्य झाल्याने घेतला गळफास

उन्हाळ्यात दर्शन नाही

अख्खा उन्हाळा जंगलात घालविल्यानंतर वाघाचे दर्शन अधिकाऱ्यांना झाले नाही. आता म्हणतात की झुडूपे असल्यामुळे डॉट मारणे शक्‍य होत नाही. वनविभागाचे हे वक्तव्य सत्य परिस्थिती लपवीत आहे. या संपूर्ण मोहिमेत अनेक कच्चे दुवे असल्याचे काही प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, कमजोर कडी बाजूला सारून या मोहिमेवर शोध घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारीही फारसे गंभीर नव्हते. त्यामुळे ही मोहीम कागदोपत्री सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा बळी गेल्याचा आरोप होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiger who killed 10 people is still not caught by forest department