video : हुशऽऽ! वाघ निघाला जंगलाच्या दिशेने 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

> मूळ अधिवासाकडे निघाला असून सुकळी, खडका दिशेने तो रवाना 
> वनविभागातर्फे ठिकठिकाणी कॅमेरे लाऊन घेण्यात आली खबरदारी 
> सगळ्या संभाव्य मार्गावर कॅमेरा ट्रॅप 
> शेतात काम करणाऱ्या लोकांना मुखवटे वाटप 

नागपूर : मिहान प्रकल्पात काही कंपन्या सुरू झाल्या आहेत. नोकरीनिमित्त, कामानिमित्त नागरिकांची येथे नेहमी रेलचेल सुरू असते. भल्या पहाटे तसेच रात्री उशिरा येथून वाहनांची वर्दळ असते. तसेच आजूबाजूच्या गावांतूनही नागरिक ये-जा करीत असतात. मात्र, हा परिसर रविवारीपासून वाघामुळे चांगलाच चर्चेत आला होता. मिहान परिसरात मुक्काम ठोकणारा वाघ आपल्या मूळ अधिवासाकडे निघाला असून सुकळी, खडका या दिशेने तो रवाना झाला आहे. यामुळे सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे. 

 

https://www.esakal.com/vidarbha/tiger-mihan-area-nagpur-236651

शनिवारी मिहान परिसरात वाघाचे ठसे आढळले होते. यामुळे एकच खळबळ उडाली होती. दुसऱ्या दिवशी वनविभागाने कॅमेरे लाऊन ट्रॅप लावले असता त्यात याच भागात वाघ फिरताना आढळून आला. यामुळे मिहान परिसरात नोकरी करणाऱ्या तसेच शेजारी राहणाऱ्यांमध्ये घबराहाट निर्माण झाली होती. पुढे बुटीबोरी परिसरातील सुमढाणा गावात तो अनेकांना दिसला होता. 

Image may contain: 5 people, people standing, outdoor and nature
मुखवटे कसे वापरायचे याबद्दल मार्गदर्शन करताना मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते

वाघाचा वावर लक्षात घेऊन वनविभागातर्फे ठिकठिकाणी कॅमेरे लाऊन खबरदारी घेतली जात होती. गुरुवारही सुकळी व खडाका या दिशेने जाताना तो कॅमेरात आढळला. पुढे हिंगणा परिसराला लागून जंगल असल्याने तो आपल्या मूळ अधिवासाकडे जात असल्याचे बघून वनविभागाच्या अधिकाऱ्यांची चिंता मिटणार आहे.

Image may contain: plant, outdoor and nature
परिसरातील सुकळी, खडका शेतांमध्ये आढळलेले वाघाच्या पायाचे ठसे.

सगळ्या संभाव्य मार्गावर कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहे. जोपर्यंत वाघ आपल्या मूळ अधिवासात जात नाही तो पर्यंत सर्व पथके तैनात ठेवण्याचा निर्णय वनविभागाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

Image may contain: 2 people, people standing and outdoor
खबरदारीसाठी परिसरातील शेतकरी मुखवटे घालून शेतात काम करताना 

गावकऱ्यांना प्रशिक्षण

गुरुवारी सुकळी खडका व त्या भागातील सर्व सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील यांची बैठक वन सभागृह घेतली. त्यांना वाघाचे अस्तित्व असेल तर काय खबरदारी घ्यायची व गावकऱ्यांना काय खबरदारी घ्यायला लावायची याबद्दल पूर्ण प्रशिक्षण दिले. नंतर प्रत्यक्ष त्या भागात जाऊन शेतात काम करणाऱ्या लोकांना मुखवटे वाटून ते कसे वापरायचे याबद्दल मार्गदर्शन मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी केले. सोबत अविनाश लोंढे, विनित अरोरा, सहाय्यक वनसंरक्षक, श्री. काळे, श्री. चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. ठोकळ व त्याचे कर्मचारी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tigers leave for the forest in Mihan