मिहान पुन्हा चर्चेत; पण कशासाठी? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसला वाघ 
वाघ व मानवात संघर्ष होऊ नये म्हणून जनजागृती 
शेजारच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना 
पावलांचे ठसे आढळलेल्या मार्गावरील कॅमेरा ट्रॅपमध्ये केली वाढ

नागपूर : मिहान प्रकल्प आजपर्यंत रोजगार, उद्योग आदी कारणांसाठी नेहमी चर्चेत राहिला आहे. मोठा गाजावाजा करून हा प्रकल्प सुरू करण्यात आला. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. मोठे उद्योग येणार, मुलांना रोजगार मिळणार, गरिबी मिळणार या विचारातून शेतकऱ्यांनीही आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी दिल्या. मात्र, त्या तुलनेत मिहानमध्ये कंपन्या आल्या नाही तसेच युवकांना रोजगार मिळाला नाही. 

मिहान प्रकल्पात काही कंपन्या सुरू झाल्या आहेत. नोकरीनिमित्त, कामानिमित्त नागरिकांची येथे नेहमी रेलचेल सुरू असते. भल्या पहाटे तसेच रात्री उशिरा येथून वाहनांची वर्दळ असते. तसेच आजूबाजूच्या गावांतूनही नागरिक ये-जा करीत असतात. येथील कंपन्या, बंद असलेल्या कंपन्या व परिसर पाहून वेगवेगळे विषय र्चेत निघत असतात. मात्र, हा परिसर रविवारीपासून दुसऱ्याच कारणानी चर्चेत आला आहे. 

मिहान प्रकल्पातील इन्फोसिस आयटी कॅम्पसजवळ लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये रविवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास वाघाचे छायाचित्र आले आहे. त्यावरून या परिसरात वाघ असल्याचे अधोरेखित झाले आहे. वन विभागाने वाघाच्या पावलांचे ठसे आढळलेल्या मार्गावरील कॅमेरा ट्रॅपमध्ये वाढ केली आहे. वनकर्मचारी आणि अधिकाऱ्यांची गस्त वाढविण्यात आली आहे. 

हिंगणा, फेटरी, दहेगाव आणि वडगाव परिसरात ऑगस्ट महिन्यात वाघ दिसला होता. आता आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या मिहान प्रकल्पातही वाघ दिसला आहे. वाघ आता शहराच्या वेशीवर आल्याचे अधोरेखित झाले आहे. इन्फोसिस आयटी कंपनी आणि टाटा एरोनॉटिक लिमिटेड या दोन कंपन्यांच्या मधल्या भागात वाघ दिसला.

हा वाघ हिंगणा वनपरिक्षेत्रातून आल्याची चर्चा आहे. हिंगणा आणि सेमिनरी हिल्स या दोन्ही वनपरिक्षेत्रांतील कर्मचारी वाघाचा मागोवा घेत असून शेजारच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देत आहेत. रविवारी या परिसरात 15 कॅमेरा ट्रॅप लावले होते. त्यात आता वाढ करण्यात आली असून आता ती संख्या 25 वर नेली आहे. 

मिहानमधील आयटी कंपनीचा सुरक्षा कर्मचारी दुचाकीने घरी परतत असताना वाघ दिसला होता. वन विभागाला कळविल्यानंतर सेमिनरी हिल्स व हिंगणा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी पोहोचले. दरम्यान, वाघाच्या पायाचे ठसे आढळले त्या मार्गावर 15 कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले होते. सोमवारी सकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कॅमेरा ट्रॅपची पाहणी केली, तेव्हा कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाच्या पार्श्‍वभागाचे छायाचित्र सव्वादहा वाजता टिपण्यात आले. 

हिंगणा आणि सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी वाघांचा मागोवा घेण्यासाठी गस्त वाढवली आहे. गस्त पथकाचे कर्मचारी मिहान परिसर व वाघांच्या पावलांचे ठसे आढळलेल्या मार्गावरील गावात जाऊन नागरिकांना सतर्क करीत आहेत. घाबरू नका, असे आवाहनही करीत आहेत. तसेच वाघाला पुन्हा त्याच्या अधिवासात पाठविण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार त्या वाघाला आता हिंगणा वनपरिक्षेत्रात पुन्हा पाठविण्यासाठी फटाके फोडणे आणि त्या मार्गावर अडथळा येणार नाही याचा दक्षता घेतली जात आहे. 

एचसीएलच्या कर्मचाऱ्यांना सूचना 
मिहान परिसरात वाघांचे अस्तित्व असल्याचे उघड झाल्याने कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रवास करताना सतर्क राहण्याचा सल्ला एचसीएल प्रशासनाने दिला आहे. 

परिसरात जनजागृती 
मिहान परिसरात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाच्या पार्श्‍वभागाचे छायाचित्र टिपण्यात आले आहे. वाघ व मानवात संघर्ष होऊ नये म्हणून त्या परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. या परिसरात 25 कॅमेरा ट्रॅप लावले आहेत.
- प्रभुनाथ शुक्‍ल, उपवनसंरक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tigers in the Mihan area