Vidhan Sabha 2019 तिवसा मतदारसंघात थेट लढत

File photo
File photo

अमरावती : चार तालुक्‍यांत विभागल्या गेलेल्या व क्षेत्रफळाने विस्तीर्ण झालेल्या तिवसा मतदारसंघात या वेळी एकास एक लढतीचे चित्र आहे. आमदार ऍड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या संघटनात्मक भक्कम बांधणीला छेद देण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपची साथ किती मिळेल? हा प्रश्‍न इच्छुकांच्या असंतोषामुळे निर्माण झाला आहे.
मराठा, माळी व मुस्लिम मतदारांची संख्या तुलनेने अधिक असली तरी धनगर व तेली समाजाची मतेही भरपूर असल्याने हा मतदारसंघ बहुजातीय व बहुभाषिक असा आहे. कोणत्याही एका जातीचे वर्चस्व नसलेला हा मतदारसंघ आहे. नगर परिषद नसलेल्या व चार तालुक्‍यांत विभागल्या गेल्याने विस्तीर्ण बनलेला हा मतदारसंघ संपूर्ण ग्रामीण आहे. अप्पर वर्धा धरणाचे पाणी या मतदारसंघातून जात असले तरी त्याचा लाभ मात्र या भागातील लोकांना होत नाही. मात्र, जमीन चांगली असल्याने शेती चांगली आहे व मिश्र स्वरूपाचे आर्थिक जीवनमान आहे.
राजकीयदृष्ट्या कोणत्याच एका पक्षाचे वर्चस्व राहिले नसल्याचा इतिहास आहे. 1978 मध्ये अस्तित्वात आलेल्या तिवसा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या आठ निवडणुकांत कॉंग्रेसने चारवेळा विजय मिळवला आहे. 1978 मधील पहिल्याच निवडणुकीत कॉंग्रेसच्याच मात्र अपक्ष राहिलेल्या चंद्रकांत ठाकूर यांनी तर एकवेळा भाकपच्या भाई इंगळे यांनी 1990 मध्ये विजय संपादन केला. 1999 व 2004 मध्ये भाजपच्या साहेबराव तट्टे यांनी सलग दोनवेळा विजय मिळवल्याने हा मतदार कोणत्याच एका पक्षाचा बालेकिल्ला बनला नाही. मोर्शी, राजूरवाडी या परिसरात कम्युनिस्टांचे अस्तित्व आहे. नेरपिंगळाई ही त्यांची राजधानी आहे. मात्र, आता त्या चळवळी नसल्याने त्यांचे अस्तित्व शक्तिप्रदर्शनात कमी आहे, तर वऱ्हा-कुऱ्हा या परिसरातून संघाने प्रारंभ केला खरा, मात्र तो मतदारसंघात फारसा फोफावला नाही. साहेबराव तट्टे यांनी व्यक्तिगत संपर्कातूनच दोनवेळा विजय मिळवला. त्यानंतर आतापर्यंत भाजपला या मतदारसंघात सूर गवसला नाही.
2009 पासून कॉंग्रेसने हा मतदारसंघ स्वतःकडे राखण्यात यशोमती ठाकूर यांनी यश मिळवले आहे. ऍड. यशोमती ठाकूर यांनी 2004 मधील पराभवानंतर सातत्याने मतदारसंघात संपर्क ठेवून संघटनात्मक बांधणी केली. त्याचा लाभ त्यांना सलग दोन निवडणुकीत झाला. या वेळी त्यांच्यासमोर शिवसेनेचे आव्हान आहे. भाजपची मर्यादित शक्ती व सेनेचे संघटन यावर त्यांची मदार आहे. तूर्तास या मतदारसंघात इतर उमेदवार बघता थेट लढतीचे चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षेला छेद
कोणत्याही स्थितीत तिवसा मतदारसंघ आपल्या तंबूत दाखल करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत महाजनादेश यात्रेचा गुरुकुंज मोझरीतून प्रारंभ करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना स्वपक्षात तोडीचा उमेदवार मिळाला नाही. अखेर 2009 च्या युतीच्या सूत्रानुसार शिवसेनेला लढाईसाठी पाठवून सुटका करून घेण्यासोबत युतीधर्म निभावण्यात त्यांना धन्यता मानावी लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com