धानाची होतेय टिपीव लागवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

धानाची होतेय टिपीव लागवड

धानाची होतेय टिपीव लागवड

शिवनी (जि. नागपूर) : हवामान बदलाच्या काळात शेतीउत्पादन शाश्‍वत करण्यासाठी शेतकऱ्यांनी बदल करणे सुरू केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात पीक लागवड ओलिताची नव्हे तर कोरडवाहू होत असल्याचे चित्र यावर्षी रामटेक मौदा तालुक्‍यात पाहायला मिळत आहे. शेतात धानाची पारंपरिक पद्धतीने लागवड न करता धानाची टिपीव लागवड करून उत्पादनाचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.
खत व बियाण्यांचे वाढलेले दर, नैसर्गिक आपत्ती, कमी पडणारा पाऊस, धान लागवड व काढणी करताना होणारी मजुरांची ओढाताण यामुळे खर्च अधिक व उत्पादन कमी अशा दुष्टचक्रात धान उत्पादक सापडला आहे. नागपूर विभागाच्या धान पट्ट्याच्या शेवटच्या आठवड्यात पारंपरिक पद्धतीने धानाची लागवड केली जाते. पावसाचे नक्षत्र सूरू असताना ही पाऊस वेळेवर न पडल्यामुळे धान पिकाची अजूनपर्यंत मौदा रामटेक तालुक्‍यात चिखल रोवणीला सुरुवात झालेली नाही. यामुळे निश्‍चितच उत्पादनात घट निर्माण होईल. अनेक शेतकऱ्यांनी यावर पर्याय शोधला आहे. धानाची चिखलवणी पद्धतीने पेरणी न करता शेतात धान टिपीव पद्धत केली जात आहे. यामुळे वेळ, श्रम व पैशाची बचत होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या भागात आता शेतकरी टिपीव पद्धततीने लागवड करीत आहेत.
घरजाळे यांनी केला पहिला प्रयोग
रामटेक तालुक्‍यातील हातोडी येथील कमलाकर गोविंदा घरजाळे यांची धान पिकाची एकूण चार एकर शेती आहे. 2017 साली कमी पावसामुळे त्यांनी संपूर्ण शेतशिवार पडीक ठेवले. 2018 मध्ये त्यांचा मुलगा आणि वडील यांनी विचार करून धानाची टिपीव नवीनच पद्धत लागवड केली या टिपीव पद्धतीत त्यांना भरघोस उत्पादन मिळाल्याचे सांगितले.
शाश्‍वत बदल गरजेचा
भात हे रामटेक तालुक्‍यातील मुख्य पीक आहे. या पिकावरही हवामानाच्या घटकांचे परिणाम जाणवत आहेत. पुढेही अशीच स्थिती कायम राहिल्यास शेतीक्षेत्र पुरते अडचणीत येऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडेल. कोरडवाहू भागात हे परिणाम आणखी भीषण स्वरूपात दिसू लागले आहेत. हवामान बदलाच्या अनुषंगाने शेतीमधून शाश्‍वत उत्पन्नासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी लागवड पद्धतीत बदल केल्यास लागवड खर्चात बचत करण्यास मदत होईल. तसेच उत्पादनात निश्‍चितच वाढ होईल.
- मधुकर दमाहे, नगरधन
मी संपूर्ण पन्नास एकरात टिपीव पद्धतीची लागवड केली. यामध्ये एकरी सात हजार रुपयांची बचत झाली असून सरासरी 50 एकर मागे 250 लाखांची बचत केली.
- हरीहर चापले, नंदापुरी

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tip is to be planted