भरधाव टिप्पर घुसला शाळेच्या आवारात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

नागपूर - काळ बनून आलेला अनियंत्रित टिप्पर थेट शाळेच्या पार्किंगमध्ये शिरला. परिसरात उभ्या स्कूल व्हॅनला एकामागून धडक देत स्थिरावला. या घटनेत तब्बल चार स्कूलव्हॅन क्षतिग्रस्त झाल्या. त्यातील एका व्हॅनमधून उतरत असलेले पाच विद्यार्थी आणि एक व्हॅनचालक असे एकूण सहा जण जखमी झाले. एका व्हॅनचा अक्षरश: चुराडा झाला. सुदैवाने या व्हॅनमध्ये कुणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. सहाही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. 

नागपूर - काळ बनून आलेला अनियंत्रित टिप्पर थेट शाळेच्या पार्किंगमध्ये शिरला. परिसरात उभ्या स्कूल व्हॅनला एकामागून धडक देत स्थिरावला. या घटनेत तब्बल चार स्कूलव्हॅन क्षतिग्रस्त झाल्या. त्यातील एका व्हॅनमधून उतरत असलेले पाच विद्यार्थी आणि एक व्हॅनचालक असे एकूण सहा जण जखमी झाले. एका व्हॅनचा अक्षरश: चुराडा झाला. सुदैवाने या व्हॅनमध्ये कुणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. सहाही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. 

आदी वाघ, स्वरा जांगीड दोन्ही इयत्ता सातवी, लवांश वानखेडे, तनिष्क ओपुरी आणि सुकृत चन्ने तिन्ही इयत्ता पाचवी अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे सांगण्यात आली. आदीचे डोके व पायाला मार असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इतरांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. बेसातील वेळाहरी परिसरात असलेल्या पोद्दार इंटरनॅशनल शाळेच्या आवारात शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. सकाळची वेळ असल्याने विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या व्हॅन पार्किंगमध्ये उभ्या होत्या. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, घोगलीकडे जाणारा टिप्पर अचानक अनियंत्रित झाला आणि लोखंडी तारांचे कुंपण तोडत थेट पोद्दार इंटरनॅशनल शाळेच्या आवारात घुसला. एकामागून चार उभ्या व्हॅनला धडक दिल्यानंतरच टिप्पर थांबला.

सर्वांत प्रथम धडक बसलेल्या व्हॅनचा अक्षरश: चुराडा झाला होता. उर्वरित तीन व्हॅनचेही मोठे नुकसान झाले. सर्वाधिक क्षतिग्रस्त झालेल्या व्हॅनमध्ये कुणीही नव्हते. पण, चौथ्या व्हॅनमधील विद्यार्थी उतरण्याच्या तयारीत होते. धडक बसल्याने पाच विद्यार्थी जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच हुडकेशवर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. संतप्त पालक आणि नागरिकांनी पोलिसांपुढे अडचणी मांडत रोष व्यक्त केला. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढत त्यांना शांत केले. घटनास्थळवारूनच आरोपी टिप्परचालक मारोती कावळे (२८, रा. भिवापूर अड्याळ) याला पोलिसांनी अटक केली. 

रोडच्या अर्धवट कामामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करीत स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. संतप्त पालकांनी शाळेच्या पार्किंगचा मुद्दा उपस्थित केला.

पालकमंत्र्यांपुढे वाचला तक्रारींचा पाढा
घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शाळेला भेट दिली. घटनास्थळाचे निरीक्षण केल्यानंतर त्यांनी शाळा व्यवस्थापनाकडून अपघाताबाबत सविस्तर माहिती घेण्यासोबतच जखमींच्या प्रकृतीसंदर्भात विचारणा केली. तत्पश्‍चात उपस्थित पालक आणि स्थानिक नागरिकांसोबत चर्चा केली. यावेळी पालकांनी तक्रारी व समस्यांचा पाढाच त्यांच्यापुढे वाचला. रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: tipper accident school area