रामटेकच्या गडावर मध्यरात्री जळाला "टिपूर'

रामटेक ः गडावर मध्यरात्री बारा वाजता जाळण्यात आलेल्या टिपूरमुळे आकर्षक दिसणारे गडमंदिराचे दृष्य.
रामटेक ः गडावर मध्यरात्री बारा वाजता जाळण्यात आलेल्या टिपूरमुळे आकर्षक दिसणारे गडमंदिराचे दृष्य.

रामटेक (जि.नागपूर) ः त्रिपुरासुरावर भगवान शंकराने विजय मिळवल्याचे स्मरण म्हणून श्रीराम-लक्ष्मण मंदिरावर "टिपूर' जाळण्यात आला. हा क्षण अनुभवण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडसह देशाच्या इतरही भागांतून रामभक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

रामटेकच्या प्रसिद्ध रामगिरी टेकडीवर 12 व्या शतकात यादव राजा रामदेवराय यांनी निर्मिलेली श्रीराम-जानकी व लक्ष्मणाची मंदिरे आहेत. पूर्वी येथे पाद्यपूजा होत होती. रघुजीराजे भोसले नागपूरकर यांनी या मंदिरांचा जीर्णोद्धार करून मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर या मंदिरात विविध उत्सव साजरे करण्यात येऊ लागले. तीच परंपरा अद्याप गडमंदिरावर सुरू आहे. गडमंदिरावर दोन मोठ्या यात्रा भरतात. एक रामनवमीला तर दुसरी कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमा यात्रा. त्रिपुरी पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला होता. त्या दिवसाचे स्मरण चिरंतन राहावे यासाठी ही यात्रा भरवली जाते.

या दिवशी मध्यरात्री ठीक 12 वाजता श्रीराम मंदिर व लक्ष्मण मंदिराच्या कळसावर जीर्ण वस्रे तुपात भिजवून जाळली जातात. यालाच टिपूर जाळणे अर्थात टिपूर यात्रा म्हटले जाते. ठीक 12 वाजता श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी मुकुंदराव पंडे, धनंजय पंडे, संजय पंडे, श्रीराम मंदिराच्या कळसाजवळ श्रीराम व जानकीची जीर्ण वस्त्रे अग्नीच्या स्वाधीन केलीत. त्यावेळी हा क्षण अनुभवण्यासाठी जमलेल्या हजारो रामभक्तांच्या कंठरवातून "जय श्रीराम"च्या गगनभेदी जयघोष निनादू लागला. त्याचवेळी लक्ष्मण मंदिराच्या कळसाजवळ लक्ष्मण स्वामींची जीर्ण वस्त्रे लक्ष्मण मंदिराचे मुख्य पुजारी अविनाश पंडे, राम पंडे, डॉ. प्रशांत पंडे, दत्तूभाऊ पंडे, सारंग पंडे यांनी अग्नीच्या स्वाधीन करताच "जय श्रीराम-जय लक्ष्मण' हा जयघोष निनादू लागला. 


सायंकाळी 5 वाजता विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातून राम-कृष्ण रथाचे पूजन करून रथयात्रा प्रारंभ झाली. काकडआरती भक्त परिवाराद्वारे रथयात्रेचे आयोजन केले जाते. रथयात्रा रामतलाई धार्मिक मैदानावर पोहोचल्यानंतर तिथे महाआरती होऊन महाप्रसाद घेतल्यानंतर रथयात्रेचा समारोप झाला.  

 
.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com