पोलिसांच्या त्रासाला कंटाळून युवकाची आत्महत्या!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः वाडी पोलिसांनी विनाकारण खोट्या गुन्ह्यात गोवल्यानंतर चौकशीच्या नावाखाली मानसिक व शारीरिक त्रास देत असल्यामुळे एका युवकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अतुल प्रभाकर ठवरे (29, नेताजीनगर, कळमना) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
कळमना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल हा वाडीतील एका खासगी कंपनीत काम करीत होता. गेल्या 3 महिन्यांपूर्वी वाडी पोलिसांनी त्याच्यावर खंडणी वसुलीचा गुन्हा नोंदविला होता. तेव्हापासून तो तणावात होता. त्यातच नोकरीवरून काढण्यात आल्याने तो बेरोजगारही झाला. पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने त्याला कुठे नोकरीही मिळत नव्हती. घरची आर्थिक स्थिती खोळंबली होती. यामुळे अतुल तणावात होता. मंगळवारी पत्नी कामावर गेली होती. दुपारी जेवण केल्यानंतर अतुल आपल्या 4 वर्षांच्या मुलाला घेऊन खोलीत झोपण्यासाठी गेला. सायंकाळी 4.30 वाजता आई आशाने त्याला आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. खूप वेळेपर्यंत आई दारातच उभी राहिली. अखेर अतुलच्या मुलाची झोप उघडली. आजीने त्याला दार उघडण्यासाठी सांगितले. मुलाने दार उघडताच अतुल गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. त्याने छताच्या हूकला दोरी बांधून गळफास लावला होता. घटनेची माहिती शेजारी, कुटुंबीय आणि पोलिसांना देण्यात आली. कळमना पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

पोलिसांवर गंभीर आरोप
अतुल ठवरे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाइड नोट लिहिली. सध्या तो जामिनावर होता. त्याला चौकशीसाठी वाडी पोलिस ठाण्यात बोलावण्यात येत होते. त्यावेळी पोलिस त्याला त्रास देत होते. त्यामुळे पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्याने सुसाइड नोटमध्ये नमूद केल्याची माहिती कळमना पोलिसांनी दिली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com