आरटीईची दुसरी सोडत आज 

आरटीईची दुसरी सोडत आज 

नागपूर - राज्याच्या शालेय शिक्षण विभागाद्वारे शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत देण्यात येत असलेल्या 25 टक्के प्रवेशाच्या सोडतीत 6 हजार 838 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. यापैकी तीन हजार 993 विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. उर्वरित तीन हजार 106 जागांसाठी होणाऱ्या दुसऱ्या सोडतीचे आयोजन उद्या शुक्रवारी करण्यात आले आहे. उद्या दुपारी ऑनलाइन पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. 

शहरात आरटीईच्या 7 हजार 99 जागांसाठी 23 हजार 486 पालकांनी अर्ज केले होते. आठ मार्चला लागलेल्या सोडतीत 6 हजार 838 विद्यार्थ्यांचा क्रमांक लागला. त्यांना दहा ते वीस मार्चदरम्यान शाळांमध्ये प्रवेश घ्यावयाचा होता. यावर्षी शिक्षण विभागाने भाड्याने राहणाऱ्या प्रत्येकच पालकाला दुय्यम निबंधक कार्यालयातून किमान दोन वर्षे किरायाने राहत असल्याचा करारनामा तयार करून आणण्यास सांगितले होते. शिवाय ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम फेरीत प्रवेश घेतला नाही, त्याला दुसऱ्या फेरीत बाद करण्यात येईल, असेही स्पष्ट केले होते. या अटींमुळे भाड्याने राहणाऱ्या बऱ्याच पालकांना करारनामा तयार करण्यात अडचण येत आहे. मात्र, शाळांनी हे प्रमाणपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यास नकार दिला. त्यातूनच कालपर्यंत 433 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झाले होते. त्यामुळे 20 मार्चला बऱ्याच कमी पालकांना त्यांच्या पाल्यांचा प्रवेश करता आला. त्यानंतर शाळांनी पालकांना मुभा दिल्याने 29 मार्चपर्यंत तीन हजार 106 जागांवर प्रवेश देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी दिली. मात्र, पहिल्या सोडतीत निवड झालेल्या मात्र, प्रवेश न घेणाऱ्या पाल्यांचा विचार यात केल्या जाणार नसल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. उद्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येतील. 

सोडतीचे अधिकार विभागाला 
राज्यातील सर्वच जिल्ह्यांत आरटीईअंतर्गत प्रवेश देण्यात येत आहे. या सर्वच प्रक्रियेची सुरुवात एकाचवेळी करण्यात आली. मात्र, दुसरी सोडत घेण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व अधिकार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती संचालक गोविंद नांदेडे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com