आज मतदानवार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नागपूर - नागपूर, अकोला आणि अमरावती महानगरपालिका तसेच वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली जिल्हा परिषदांसाठी उद्या (ता. 21) मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार असून 318 नगरसेवक आणि जिल्हा परिषदेच्या 83 गटांसाठी मतदान होणार आहे. 

नागपूर - नागपूर, अकोला आणि अमरावती महानगरपालिका तसेच वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि गडचिरोली जिल्हा परिषदांसाठी उद्या (ता. 21) मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार असून 318 नगरसेवक आणि जिल्हा परिषदेच्या 83 गटांसाठी मतदान होणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे शहर असल्याने नागपुरातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत 38 प्रभागांतील 151 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष असे एकूण 1 हजार 135 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी साडेसातपासून शहरातील 2 हजार 783 केंद्रांवर मतदानाला प्रारंभ होईल. शहरात 20 लाख 93 हजार 392 मतदार आहेत. मतदानासाठी महापालिका प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून आज मतदान अधिकाऱ्यांना संबंधित साहित्य पुरविण्यात आले. ईव्हीएममध्ये काही बिघाड झाल्यास तत्काळ दुरुस्तीसाठी हैदराबाद येथून इलेक्‍ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे दोन तज्ज्ञ अभियंते शहरात दाखल झाले. मतदानासाठी पाच हजार पोलिस मतदान केंद्रांसह वेगवेगळ्या भागांत तैनात करण्यात आले आहेत. 

अमरावतीत 87 नगरसेवक 22 प्रभागांमधून तर अकोल्यात 20 प्रभागांमधून 80 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. यासोबतच अमरावती जिल्हा परिषदेचे 59 गट आणि पंचायत समितीच्या 86 गणांसाठी निवडणूक होत आहे. धारणी, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि तिवसा येथील गणांसाठी मतदान होणार नाही. गडचिरोली, यवतमाळ आणि वर्धा जिल्हा परिषदेसाठी उद्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चार तालुक्‍यांत 16 गट आणि 32 गणांसाठी मतदान होत आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी आणि 12 गणांसाठी तर वर्ध्यात दोन गट आणि चार गणांसाठी मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. 

अमरावतीत दीड हजार उमेदवार 
अमरावती महानगरपालिका निवडणुकीत 627 उमेदवार रिंगणात आहेत. 5 लाख 72 हजार 548 मतदार 735 केंद्रांवर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून 3 हजार 265 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील 735 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यातील 170 केंद्रे संवेदनशील आहेत. जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी 426 तर पंचायत समितीच्या 88 गणांसाठी 532 उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी एकूण 1 हजार 786 मतदान केंद्रे असून यातील 511 संवेदनशील आहेत. 

अकोल्यात 579 उमेदवार 
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी पावणेपाच लाख मतदार 579 उमेदवारांचे भाग्य निश्‍चित करणार आहेत. या निवडणुकीसाठी महापालिका, महसूल तसेच पोलिस यंत्रणा आता सज्ज झाली आहे. शहरातील 587 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यातील 187 मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. चार हजार कर्मचारी निवडणुकीच्या कामावर तैनात आहेत. 

नक्षलग्रस्त भागात बंदोबस्त 
गडचिरोली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या मंगळवारी (ता. 21) होणाऱ्या मतदानासाठी माओवादग्रस्त भागांमध्ये 30 हजारांहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. एकूण 242 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद होईल. गडचिरोलीत 72 संवेदनशील, तर 174 अतिसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा या चार तालुक्‍यांतील जिल्हा परिषदेचे 16 गट तर पंचायत समित्यांच्या 32 गणांसाठी एकूण 242 उमेदवार भाग्य आजमावत आहेत. जिल्हा परिषदेच्या 16 गटांसाठी 89, तर पंचायत समितीच्या 32 गटांसाठी 153 उमेदवारांचा समावेश आहे. 

यवतमाळमध्ये 18 जागा 
यवतमाळ जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समित्यांचे 12 गण असे एकूण 18 जागांसाठी मतदान होत आहे. सहा गटांतील 179 मतदान केंद्रांवर मतदान होईल. या दुसऱ्या टप्प्यात एक लाख 47 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

वर्ध्यात चार गण 
वर्धा जिल्हा परिषदेच्या मोरांगणा व वाठोडा गट तसेच पंचायत समितीच्या वाठोडा, देऊरवाडा, मोरांगणा व काचनूर या चार गणांसाठी उद्या मतदान होत आहे. एकूण 27 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 29 केंद्रांवर मतदानासाठी 156 कर्मचारी तैनात आहेत. 26 हजार 199 मतदार आहेत. 

Web Title: today voting