आता मतदार राजाची "बारी' 

आता मतदार राजाची "बारी' 

नागपूर - गेली बारा दिवस नेत्यांनी प्रचारसभा गाजविल्यानंतर आता उद्या खऱ्या अर्थाने मतदार राजाचा दिवस आहे. 151 जागा असलेल्या महापालिकेत कौल देण्यासाठी मतदार राजाही सज्ज झाला आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनानेही कंबर कसली असून आज सर्वच 2,383 मतदान केंद्रांवर ईव्हीएमसह इतर साहित्य घेऊन अधिकारी पोहोचले. निवडणूक रिंगणातील उमेदवारांनीही मतदान केंद्रावर प्रतिनिधी नियुक्त केले असून मतदारांना निवडणूक केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी अनेकांनी वाहनांचाही बंदोबस्त केला आहे. उद्या सायंकाळपर्यंत 1,135 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान काही तासांवर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा असलेला मतदानासाठी आज दिवसभर मतदान साहित्य घेण्याकरिता निवडणूक अधिकाऱ्यांनी बाराही झोनमध्ये गर्दी केली. मतदान साहित्य घेतल्यानंतर सर्वच अधिकाऱ्यांनी आज मतदान केंद्रावर ईव्हीएमची तपासणी केली. त्यानंतर रात्रीपर्यंत ईव्हीएम, टेबल लावण्यात आले. दोन अधिकारी व पोलिस आज रात्रभर मतदान केंद्रावर राहणार आहेत. प्रशासनासोबतच राजकीय पक्षांनीही आज वस्त्या, झोपडपट्ट्यांमध्ये आपापली शक्ती पणाला लावली. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काही नाराज असलेल्यांना आजही भेटून त्यांची नाराजी दूर केली. याशिवाय उद्या मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठीही काहींनी मोर्चेबांधणी केली. प्रशासन व राजकीय पक्षाचे नेते, उमेदवारांनी आज रात्रीपर्यंत केलेल्या तयारीला उद्या मतदार कसा प्रतिसाद देतात, याकडे आता लक्ष लागले आहे. 

मतदारयादीतील नाव शोधून देणार अधिकारी 
मतदार केंद्रावर मतदार आल्यानंतर त्याचे नाव शोधून देण्यासाठी निवडणूक अधिकारी मदत करणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर असलेल्या "ट्रू वोटर' ऍपवरून ते मतदारांना त्यांचे नाव, मतदान केंद्र क्रमांक व पत्ता सांगतील. 

प्रभाग ः 38 
जागा ः 151 
उमेदवार ः 1,135 
मतदान केंद्र ः 2,783 
संवेदनशील मतदान केंद्र ः 162 
मतदार ः 20 लाख 93 हजार 392 
मतदानाची वेळ ः सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत. 

ईव्हीएम दुरुस्तीसाठी तज्ज्ञ दाखल 
मतदानासाठी 2,783 ईव्हीएम असून बिघाड झाल्यास पावणेतीनशे ईव्हीएम पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. याशिवाय ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास मतदानाची प्रक्रिया थांबू नये, यासाठी हैदराबादवरून इलेक्‍ट्रॉनिक कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे दोन तज्ज्ञ अभियंते शहरात दाखल झाले. विशेष म्हणजे हीच कंपनी ईव्हीएम तयार करते. 

संवेदनशील मतदान केंद्र 
शहरात एकूण 54 इमारतीमध्ये 162 संवेदनशील मतदान केंद्रे असून सर्वाधिक 48 मध्य नागपुरातील मोमिनपुरासारखा भाग असलेल्या कोतवाली पोलिस स्टेशनअंतर्गत आहे. त्यानंतर उत्तर नागपुरातील यशोधरानगर पोलिस स्टेशनअंतर्गत 31, पूर्व नागपुरातील लकडगंज पोलिस स्टेशनअंतर्गत 25, गणेशपेठ 19, अंबाझरी व धंतोली प्रत्येकी 12, गिट्टीखदानमध्ये 8 तर मानकापूर येथे 7 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. 

दिव्यांग मतदारासाठी डोली 
शहरातील 2,783 मतदान केंद्रांपैकी ताजाबाद माध्यमिक शाळा सिंधीबन, उमरेड रोड तसेच सेंट विसेंट हायस्कूल उदयनगर हे दोन मतदान केंद्र पहिल्या माळ्यावर आहे. त्यामुळे येथे दिव्यांगांना मतदानासाठी डोलीची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय इतर मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्प तयार करण्यात आले आहेत. 

961 इमारतींचा वापर 
एकूण 961 इमारतीत मतदान केंद्रे असून 155 इमारतीत प्रत्येकी एकच मतदान केंद्र असून 312 इमारतीत प्रत्येकी दोन, 197 इमारतीत प्रत्येकी तीन, 155 इमारतीत प्रत्येकी चार, 85 इमारतीत प्रत्येकी 5, 39 इमारतीत प्रत्येकी सहा, 11 इमारतीत प्रत्येकी सात, 6 इमारतीत प्रत्येकी 8 व एका इमारतीत नऊ मतदान केंद्रे आहेत. 

बहुरंगी मतपत्रिका 
प्रत्येक प्रभागातील अ प्रवर्गातील जागेसाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असून यावर या प्रवर्गातील सर्व उमेदवारांची नावे राहतील. ब प्रवर्गासाठी फिका गुलाबी रंग असून क प्रवर्गातील उमेदवारांची नावे फिका पिवळ्या रंगाच्या मतपत्रिकेवर राहील. ड प्रवर्गातील उमेदवारांची नावे फिका निळ्या रंगाच्या मतपत्रिकेवर नमूद राहतील. प्रभाग एक ते 37 पर्यंत चार सदस्यांना तर प्रभाग 38 मध्ये तीन सदस्यांना मतदान करणे आवश्‍यक आहे. 

पक्षनिहाय उमेदवार 
राजकीय पक्ष उमेदवारांची संख्या 
भाजप 150 
कॉंग्रेस 150 
बसप 103 
राष्ट्रवादी कॉंग्रेस 95 
शिवसेना 85 
मनसे 31 
भारिप बहुजन 18 
एमआयएम 19 
सीपीआय 3 
लोजपा 3 
सपा 7 
नोंदणीकृत अमान्यता प्राप्त पक्ष ः 145 
अपक्ष 326 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com