अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना शौचालयाची आडकाठी

अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना शौचालयाची आडकाठी

गडचिरोली - पुढील महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया  सुरू झाली आहे. अर्ज करतेवेळी शौचालयाचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक केल्याने अनेकांची अडचण झाली आहे. मात्र, खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर निवडणुकांत बाद होण्याचाही प्रसंग ओढवू शकतो. उमेदवार एकमेकांच्या अर्जावर लक्ष ठेवून असल्याने इच्छुकांनी शौचालयाचा चांगलाच धसका घेतला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दोन टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्यांची तहसील कार्यालयात एकच गर्दी दिसून येत आहे.

सुरुवातीचे दोन दिवस एकही अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र, नामांकन अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने इच्छुकांमध्ये धावपळ सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी शौचालयाचे प्रमाणपत्र बंधनकारक केले. यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून त्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे. आरक्षणामुळे दिग्गजांचे क्षेत्र बदलल्याने नव्या क्षेत्रातून निवडणूक लढणाऱ्यापुढे शौचालयाची अडचण जाणवत आहे. त्यामुळे कित्येकांनी घरे विकत घेतली तर काहींनी प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांवर भर दिला. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना अधिनियम १९५८ च्या कलम १४ कलम (ज-५) मध्ये शौचालयाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय क्षेत्र बदलविलेल्या उमेदवारांसाठी अडचणीचा ठरणार आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने पंचायत समिती स्तरावर पत्र पाठवून आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तिकीटावरून सर्वच पक्षांत बंडखोरी होण्याची शक्‍यता असून ऐनवेळी पक्षप्रवेशाचेही प्रकार  घडणार आहेत. निष्ठावंत तसेच स्थानिकांना डावलून उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक उमेदवार हवा हा मुद्दा उचलून अनेकजण बंडखोरीच्या तयारीत आहेत. यात येवली, जेप्रा, कोटगल, पोर्ला, पेंढरी, वायगाव या जिल्हा परिषद क्षेत्राचा समावेश आहे.
 

आघाड्यांवर भर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भारिप-बमसं व भाकपने तयार केलेल्या आघाडीत ओबीसी, एनटी पार्टी सहभागी झाली आहे. उपरोक्त तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक चांदेकर भवनात पार पडली. या बैठकीत ओबीसी, एनटी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरुण मुनघाटे यांनी आपला पक्ष संपूर्ण ताकदीनिशी या आघाडीत सहभागी होत असल्याचे जाहीर केले.  बैठकीला भारिप-बमसंचे ज्येष्ठ नेते रोहिदास राऊत, जिल्हाध्यक्ष प्रकाश दुधे, सरचिटणीस नसीर जुम्मन शेख, सीताराम टेंभूर्णे, बाळू टेंभूर्णे, कुलपती मेश्राम, घनश्‍याम हुलके, गोपीचंद बानबले, संदीप राहाटे, माला भजगवळी, सुरेखा बारसागडे, भाजपचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, अमोल मारकवार, विनोद झोडगे, देवराव चवळे, हरिपाल खोब्रागडे, चंद्रभान मेश्राम, ॲड. जगदीश मेश्राम उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com