पर्यटन विकासाचे ‘रामधाम मॉडेल’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

केवळ निसर्ग पर्यटनाने समाधान न होणाऱ्या पर्यटकांसाठी नागपूरपासून ४५ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग सातवर मनसर येथे रामधाम हे पर्यटनस्थळ आहे. कोणतेही धार्मिक क्षेत्र नसलेले रामधाम आज धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. विशेष म्हणजे येथील ओमची प्रतिकृती जगातील सर्वांत मोठी असल्याची नोंद लिम्का बुकमध्ये आहे. रामधामने अकराव्या वर्षात पदार्पण केले आहे. पर्यटनमित्र चंद्रपाल चौकसे यांच्या संकल्पनेतून हे कृत्रिम धार्मिक पर्यटनस्थळ साकारले आहे.  

रामटेक येथील राजकमल जलक्रीडा केंद्र, खिंडसीची नोंद ॲडव्हेंचर स्पोर्टसच्या डिरेक्‍टरीत असणे ही विदर्भासाठी गौरवाची बाब आहे. राष्ट्रीय महामार्गावर मनसर येथे सहा एकर परिसरात रामधाम साकारले आहे. रामायणात उल्लेख असलेल्या चित्रकूट पर्वताची प्रतिकृती, देवी-देवतांच्या प्रतिमांसह अन्य प्रतिकृती येथे आहेत. चित्रकूट पर्वत उभारण्यासाठी सिमेंट आणि लोखंडाचा वापर करण्यात आला. पर्वताखाली भुयारी मार्ग आहे. त्यात विदर्भासह महाराष्ट्रातील अष्टविनायक तसेच १२ ज्योतिर्लिंगांचे आणि वैष्णोदेवीचे दर्शन होते. ३५० फूट लांब व १४  फूट रूंद असलेल्या ओममध्ये प्रवेश करताच राम-लक्ष्मण आपल्या गुरूंचे राक्षसांपासून रक्षण करीत असल्याचे चित्र दिसते. याशिवाय रामायणातील विविध प्रसंग येथे साकारले आहेत. सन २००५ मध्ये रामधाम पर्यटकांच्या सेवेत रुजू झाले. शासनाच्या अनुदानाशिवाय साकारले गेलेले हे पर्यटनस्थळ विदर्भातील शाळांच्या सहलीचे केंद्र बनले आहे. विदर्भासह अन्य भागांमधील शाळांचे विद्यार्थी येथे येतात. येथे पर्यटकांची गर्दी असल्याने आजूबाजूच्या परिसरातील व्यवसाय वाढू लागला आहे. रामधाममुळे या परिसरातील ३०० ते ४०० युवकांना रोजगार मिळाला आहे. खिंडसी येथील जलक्रीडा केंद्रही पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले असून पावसाळावगळता आठ महिने पर्यटक येथे जलक्रीडेचा आनंद घेत असतात. सोबतच कृषी पर्यटनही विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील व्यक्तीला कृषीप्रधान व्यवस्थेचा ‘फिल’ येथे घेता येतो.

Web Title: Tourism development model Ramadham