उमरेड-कऱ्हांडलाकडे पर्यटकांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

नागपूर - उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे वैभव असलेला जय वाघ गेल्या वर्षभरापासून बेपत्ता असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. शिवाय पर्यटनासाठी जिप्सीची सक्ती करण्यात आल्याने पर्यटकांची संख्या 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे.

नागपूर - उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचे वैभव असलेला जय वाघ गेल्या वर्षभरापासून बेपत्ता असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. शिवाय पर्यटनासाठी जिप्सीची सक्ती करण्यात आल्याने पर्यटकांची संख्या 30 टक्‍क्‍यांनी घटली आहे.

आशियातील सर्वांत मोठा वाघ म्हणून जय अल्पावधीतच सेलिब्रिटी झाला. वाघाला पाहण्यासाठी सेलिब्रिटजसह पर्यटकांचा ओघ उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाढला होता. येथील गाइडनीही वाघाच्या भोवतीच येथील पर्यटन विकसित केले होते. हमखास वाघ दाखविण्याची हमी येथील गाइड कायम घेत होते. त्यामुळे पर्यटकही वाघ पाहण्यासाठी या अभयारण्याला आवर्जून भेट देऊ लागले होते. गेल्या वर्षी 18 एप्रिलला जय अखेरचा दिसला. तेव्हापासून अभयारण्याचे आकर्षणच कमी झाले. पर्यटकांचा ओढा वाढलेला लक्षात येताच तत्कालीन क्षेत्र संचालकांनी तडकाफडकी निर्णय घेऊन जंगल भ्रमणासाठी जिप्सीची सक्ती केली. त्यामुळे पर्यटकांवरील 1800 रुपयांचा अधिकचा भुर्दंड वाढला. हा भुर्दंड सामान्य पर्यटकांच्या खिशाला परवडणारा नसल्याने आनंदासाठी निसर्गभ्रमंती करणाऱ्यांनी पाठ फिरवली. वाघकेंद्रित पर्यटनावर भर दिला गेल्यानंतर आता वाघांचे दर्शन दुर्लभ झाल्याने त्या पर्यटकांनी येथून पाय काढले आहे. याशिवाय वन्यजीव प्राण्यांची संख्याही कमी असल्याने त्यांचेही दर्शन पर्यटकांना होत नाही. त्यामुळे पर्यटक नाराज होऊन बाहेर पडू लागले आहे. त्याचा फटका पर्यटनावर झाला. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा फक्त 70 टक्केच पर्यटकांनी या अभयारण्याला भेट दिल्याची माहिती आहे.

जिप्सीचे दर वाढविल्याने पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या फाउंडेशनला मिळणारे उत्पन्न वाढले असले तरी पर्यटकांची संख्या कमी झालेली आहे.

जिप्सीचे दर वाढविण्यापूर्वी सुटीच्या दिवशी येथे प्रवेशासाठी रांगा लागत होत्या. आता त्या रांगा कमी झाल्या असून तो आकडा फक्त दहा ते अकरावर आला आहे. परिणामी, गाइडचा रोजगार गेला. स्थानिक हॉटेल्सचा व्यवसायही कमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. जिप्सीची सक्ती रद्द करावी, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.

Web Title: tourist neglect to umred-karhandala forest