उमा नदीत ट्रॅक्‍टर कोसळून चालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

मूल (जि. चंद्रपूर) : शेतात चिखलणी केल्यानंतर नादुरुस्त झालेला ट्रॅक्‍टर दुरुस्तीसाठी मूलमध्ये नेत असताना बोरचांदली मार्गावरील पुलावरून कठडे नसलेल्या उमा नदीत तो कोसळला. यात चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.28) रात्री सात वाजताच्या सुमारास घडली. शोधपथकाच्या अविरत प्रयत्नांनंतर पाण्यात बुडालेल्या चालकाला आज, गुरुवारी नदीतून बाहेर काढण्यास यश मिळाले.

राजगड येथे धान पिकाच्या रोवणीसाठी शेतात ट्रॅक्‍टरद्वारे चिखलणी करण्यात आली. त्यानंतर ट्रॅक्‍टर नादुरुस्त झाल्याने त्याला मूलमध्ये दुरुस्तीला नेत होता. उमा नदीच्या पुलाजवळ ट्रॅक्‍टरवरील नियंत्रण सुटल्याने चालक रत्नाकर शिंदे (वय 36, रा. राजगड) ट्रॅक्‍टरसह उमा नदीत कोसळला. घटना माहीत होताच पोलिस प्रशासन आणि गावकऱ्यांनी नदीकडे धाव घेतली. नदीत पाणी भरपूर असल्याने तसेच रात्र असल्याने चालकाचा शोध लागला नव्हता. मात्र, आज गुरुवारी पोलिस प्रशासन व तहसील प्रशासनतर्फे रेस्कू टीमद्वारा शोधमोहीम राबविण्यात आली. बोटीद्वारा बेपत्ता चालकाचा शोध घेण्यात आला. तसेच क्रेनने पाण्यातून ट्रॅक्‍टर बाहेर काढण्यात आला आहे. ट्रॅक्‍टरच्या इंजिनमध्येच चालक रत्नाकरचा मृतदेह सापडला. ट्रॅक्‍टर राजगड येथील विजय नार्ले यांच्या मालकीचा होता. पोळ्याच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने राजगडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tractor driver died in Uma river