व्यापाऱ्यांकडून संपाच्या नावावर ग्राहकांची लूट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

किरकोळ बाजारात भाज्यांच्या भावात ४५ ते ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे ठोक बाजारात भाजीपाला ३० टक्के महाग झाल्याची माहिती विक्रेत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

अकोला - भीषण गर्मी, सिंचनासाठी पाण्याचा अभाव आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अकोल्यात येणारी अन्य शहरातील भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम भाज्यांच्या किमतीवर पडला आहे. व्यापाऱ्यांनी संपाच्या नावावर भाज्यांचे दर मोठ्याप्रमाणावर वाढविल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.
 
किरकोळ बाजारात भाज्यांच्या भावात ४५ ते ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे ठोक बाजारात भाजीपाला ३० टक्के महाग झाल्याची माहिती विक्रेत्यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. जनता बाजारात जिल्ह्यातील भाजीपाल्यासह मराठवाडा, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील भाजीपाला येतो. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे ठोक बाजारातच भाज्या ३० टक्के महागल्या आहेत. 

आॅगस्टपर्यंत वाढिव दर -
यावर्षी पाऊस वेळेवर येण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. अंदाज खरा ठरल्यास शेतींची कामे लवकर पूर्ण होऊन भाज्यांची आवक जुलैच्या अखेरपर्यंत वा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत गृहिणींना भाज्या महागच खरेदी कराव्या लागतील.

किरकोळमध्ये भाज्या महागच -
जनता भाजीबाजारातून सकाळी भाज्या खरेदी करून गल्लीबोळात आणि किरकोळ बाजारात विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे भाज्या महागच असतात. विविध भागात ज्यांची अस्थायी वा पक्की दुकाने आहेत, ते विक्रेते नफा जोडून विक्री करीत आहेत. त्यांचा नफा २० ते २५ टक्के असतो. अशा स्थितीत ठोक बाजारात भाज्यांचे दर ३० टक्क्यांनी वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांना ४५ ते ५५ टक्के जास्त दर आकारून बाजारात भाजी विक्री सुरू केली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Trader is taking more money from the customer for vegetables due to farmer strike