वाहतुकीचे शिक्षण देणारा गुरू हरपला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

वाहतुकीचे नियम आणि त्यासाठीचे दंड याबाबत त्यांना तोंडपाठ माहिती होती.

नागपूर : आजपावतो जवळपास 10 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आणि युवकांना वाहतूक नियमांचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे गुरू म्हणून ओळखले जाणारे रामराव यशवंत रेवतकर (वय 61, रा. आशीर्वादनगर, हुडकेश्‍वर) यांचा अपघाती मृत्यू झाला. सेवानिवृत्तीनंतरही नागपूर पोलिस विभागातील रस्ते वाहतूक सुरक्षा शाखेत सेवा देणारे रामराव यांच्या अपघाती जाण्याने पोलिस विभागात हळहळ व्यक्‍त होत आहे.

रामराव रेवतकर यांच्या जलालखेडा येथे राहणाऱ्या मुलीकडे वाढदिवसाचा कार्यक्रम होता. त्यासाठी ते आणि त्यांचे मोठे जावई प्रवीण शंकरराव बालपांडे हे दोघे दुचाकीने गेले होते. रविवारी रात्री साडेअकरा वाजता ते परत येत असताना नवीन काटोल नाका येथे त्यांच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान रेवतकर यांचा मृत्यू झाला तर प्रवीण बालपांडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला.

निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी कामावर
रामराव रेतवकर 27 डिसेंबर 2016 मध्ये रस्ते सुरक्षा पथक वाहतूक शाखेतून सेवानिवृत्त झाले. वाहतुकीचे नियम आणि त्यासाठीचे दंड याबाबत त्यांना तोंडपाठ माहिती होती. सेवानिवृत्तीनंतर घरी आरामात राहा, असा कुटुंबीयांचा हट्ट होता. मात्र, रेवतकर निवृत्त झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा आरएसपी शाखेत कामावर हजर झाले.

Web Title: traffic guru revatkar dies in accident at katol