नवतंत्रज्ञानासोबत बहरतेय वाइल्डलाइफ फोटोग्राफी

File photo
File photo

गडचिरोली : 18 व्या शतकापासून प्रारंभ झालेल्या कॅमेऱ्याच्या प्रवासात अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्वत:ची छायाचित्रे काढणारा माणूस निसर्गाच्या ओढीने वृक्ष, वेली, पाखरे, वन्यप्राण्यांचीही छायाचित्रे काढू लागला. त्यातूनच वाइल्डलाइफ फोटोग्राफी ही छायाचित्र क्षेत्रातील वेगळी शाखा निर्माण झाली आहे. देशातील मोजक्‍या आघाडीच्या वाइल्डलाइफ फोटोग्राफर्समध्ये आपल्या महाराष्ट्राचे बैजू पाटील यांचाही समावेश आहे. दिवसेंदिवस येत असलेल्या नवतंत्रज्ञानासोबत ही वाइल्डलाइफ फोटोग्राफी बहरत चालली आहे.
भारतात वाइल्डलाइफ फोटोग्राफी अर्थात वन्यजीव छायाचित्रणाची सुरुवात करणाऱ्यांमध्ये बेदी ब्रदर्स (नरेश आणि राजेश बेदी) यांच्यासोबत बेंगलुरूचे शल्यविशारद डॉ. मनोज सिंदगी, दिल्लीचे एम. सी. धिंग्रा, मुंबईचे हिरा पंजाबी यांचा समावेश आहे. देशाच्या पहिल्या महिला वन्यजीव छायाचित्रकार म्हणून रथिका रामासामी ओळखल्या जातात. वन्यजीव छायाचित्रणासाठी अंगी प्रचंड संयम असावा लागतो. याबद्दल वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी सांगितलेला किस्सा खूपच रंजक आहे. पाटील यांनी फॅन थ्रोटेड लिझार्ड (गळपंखा असलेला सरडा) या दुर्मीळ सरड्यांच्या जीवनातील दुर्मीळ क्षण टिपण्यासाठी चार, दोन महिने नाही, तर सलग तीन वर्षे वाट पाहिली. या काळात सरड्यांना सवय होण्यासाठी ते तीच पॅंट, तोच शर्ट आणि तेच जोडे वापरत राहिले. त्यानंतर त्यांना दोन सरड्यांच्या जीवनातील तो अद्‌भुत क्षण टिपता आला. अर्थात या छायाचित्राला अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पूर्वी वन्यजीवांच्या हालचालीनुसार कॅमेऱ्याची सेटिंग बदलण्याची सोय नव्हती. त्यामुळे चक्‍क तीन ते चार कॅमेरे घेऊन जावे लागायचे. रोल व स्लाइड जपानहून यायचे. ते फ्रीजमध्ये ठेवले नाही, तर खराब व्हायचे. शिवाय 36 हून अधिक छायाचित्रे काढता येत नव्हती. कॅमेरा क्‍लिक केल्यावर ते बघायला प्रिंटशिवाय पर्याय नव्हता. हे रोल धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांमध्ये थोडा फरक पडला; तरी सगळी मेहनत व्यर्थ जायची. आता सारेच बदलले आहे. मात्र, या क्षेत्रातील आव्हाने कमी झालीत, असे म्हणता येत नाही.

खुणावती नवी क्षितिजे
नवनव्या आव्हानांची आवड असणारे बैजू पाटील आता अंडर वॉटर फोटोग्राफीकडे वळले आहेत. समुद्राच्या खोल तळाशी जाऊन जीव धोक्‍यात घालत होणारी ही फोटोग्राफी करणारे जगात केवळ तीन टक्‍के लोक आहेत; तर आपल्या महाराष्ट्रात एका हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच लोक असल्याचे त्यांनी सांगितले.

काही हजारांपासून काही लाखांपर्यंत
वाइल्डलाइफ फोटोग्राफीची हौस भागविण्यासाठी आठ ते दहा हजारांच्या लेन्सपासून सुरुवात करता येते. पण, पुढे जायचे असेल, तर काही लाख सहज खर्च होतात. 800 एमएमची चांगल्या कंपनीची लेन्स 12 लाखांची आहे. तर, 1700 एमएमची लेन्स 40 ते 45 लाखांपासून सुरू होते. काही कंपन्यांच्या लेन्सची किंमत 53 लाखांच्या वर आहे. वन्यजीव छायाचित्रणासाठी योग्य मानले जाणारे एसएलआर कॅमेरे 25 हजारांपासून साडेचार लाखांपेक्षा अधिक किमतीत मिळतात.

वन्यजीव छायाचित्रणासाठी अतिशय महागडे कॅमेरे, लेन्स बाजारात उपलब्ध आहेत. पण, महागडी किट असली म्हणजे खूप दर्जेदार छायाचित्र काढता येते, असे अजिबात नाही. मात्र, कौशल्य असणे आवश्‍यक आहे. शिवाय वन्यजीवांबद्दल आत्मीयता, ओढ, त्यांचा अभ्यास करण्याची तयारी, आवड, पराकोटीचा संयम, या सगळ्या बाबी गरजेच्या आहेत.
- बैजू पाटील, वन्यजीव छायाचित्रकार, औरंगाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com