ट्रॅव्हल्समध्ये कोंबले प्रवासी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

नागपूर : दिवाळीमुळे रेल्वेगाड्या खचाखच भरून धावत असल्याने अनेकांनी खासगी बसचा पर्याय निवडला. परिणामी ट्रॅव्हल्सचे दरही सुमारे तिप्पट झाले. पण, एवढे पैसे मोजूनही ट्रॅव्हल्समध्ये जनावरं कोंबावीत तसे प्रवासी भरण्यात आल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला. ही स्थिती प्रामुख्याने पुणे व मुंबईहून नागपुरात येणाऱ्या बहुतेक खासगी बसेसमध्ये दिसून आली.

खासगी बसचे पुण्याहून नागपूरला येण्याचे भाडे साधारणपणे 1 हजाराच्या घरात असते. पण, दिवाळीत तेच भाडे 3 हजारापर्यंत पोहोचते. पैसे मोजल्यास बसायला, झोपायला जागा मिळते. परंतु, पर्याय नसल्याने बरेच प्रवासी दोन सिटांच्या मधल्या जागेत बसून प्रवास करायलासुद्धा तयार होतात. सर्वांचीच निकड असल्याने प्रवासी निमूटपणे हा प्रकार सहन करतात आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांचे चांगलेच फावते. पुण्याच्या एका ट्रॅव्हल्समध्ये असाच प्रकार दिसून आला. सुमारे अडीच हजाराचे तिकीट घेऊन प्रवासी घेण्यात आले. सर्व सिट बुक झाल्यावर पुन्हा दोन सिटच्या मधल्या जागेत प्रवासी अक्षरश: कोंबण्यात आले. ही बस नागपुरात पोहोचण्यास तब्बल 26 तास लागले. तोवर सर्वच तात्कळत होते. गर्दी अधिक असल्याने बसलेल्या प्रवाशांना उभे राहणेही शक्‍य नव्हते. या प्रकाराने सर्वांचीच गैरसोय झाली. प्रामुख्याने महिला प्रवाशांना अधिकच त्रास सहन करावा लागला. पुणे आणि मुंबईहून येणाऱ्या बहुतेक गाड्यांमध्ये अशीच अवस्था होती.
अन्य पर्याय नसल्याने प्रवासी गर्दी असूनही बसेसमध्ये चढत आहेत. पण, अधिक प्रवासी घेणाऱ्या ट्रॅव्हल्सवर आरटीओकडून कुठेही कारवाई होताना दिसत नाही, हे विशेष. आरटीओ विभाग भीषण अपघाताची वाट बघत आहे काय?, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: travelers in Travels