esakal | फवारणीबाधितांवर स्टॅंडर्ड प्रोटोकॉलप्रमाणे उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

फवारणीबाधितांवर स्टॅंडर्ड प्रोटोकॉलप्रमाणे उपचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कीटकनाशक फवारणीबाधित रुग्णांवर योग्य व त्वरित उपचार करण्यासाठी येथील शासकीय महाविद्यालयात सर्व सोयीयुक्त अद्ययावत वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे. शिवाय येथे दाखल झालेल्या फवारणीबाधित रुग्णांवर राज्य शासनाने दिलेल्या स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करण्यात येत आहेत. ऑगस्ट महिन्यात 17 दिवसांत 31 फवारणीबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
सध्या शेतमालावर कीटकनाशक फवारणीचा हंगाम सुरू झाला आहे. यादरम्यान शेतकरी, शेतमजूर विशेष काळजी घेत नसून, जहाल औषधांचे मिश्रण करून फवारणी करीत आहेत. रुग्णालयात फवारणीबाधित रुग्णांसाठी उपाययोजना व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सर्व कीटकनाशक फवारणी बाधीत रुग्ण औषधवैद्यकशास्त्र विभागांतर्गत दाखल करून घेण्यात येतात. या रुग्णांसाठी स्वतंत्र दहा खाटांचा अद्ययावत सर्व सोयींनी युक्त वॉर्ड तयार करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त अतिदक्षता कक्षातील पाच खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
रुग्णांसाठी स्वतंत्र्य पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पथकातील विशेष तज्ज्ञ डॉक्‍टर विषबाधित रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार करतात. या पथकात एक सहयोगी प्राध्यापक, एक सहायक प्राध्यापक, एक वरिष्ठ निवासी व तीन कनिष्ठ निवासी डॉक्‍टर कार्यरत आहेत. फवारणी बाधीत रुग्ण दाखल होताच त्याची माहिती पोलिस विभागाला कळविण्यात येते व तशी नोंद घेण्यात येते. सर्व प्रकारचे यंत्र व उपकरणे उपलब्ध करण्यात आले आहेत. यात दहा व्हेंटिलेटर, 15 मल्टिपॅरामॉनिटर, डिफ्रीबीलेटर, सिरींज पंप, ऑक्‍सिजन, सक्‍शन मशीन आदींचा समावेश आहे. विषाचे स्वरूप जाणण्यासाठी गॅस्ट्रिक लवाजचे केमिकल ऍनालासीस करण्यात येते. किटकनाशक फवारणी बाधीत रुग्णांवर शासनाद्वारे दिलेल्या स्टॅडर्ड ऑपरेटींग प्रोटोकॉलप्रमाणे उपचार करण्यात येतो. शिवाय रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे समाजसेवा अधीक्षक व मनसोपचार तज्ज्ञांकडून समूपदेशन करण्यात येते. गेल्या 13 ऑगस्टपासून आतापर्यंत 31 किटकनाशक फवारणी बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, चार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे तर 15 जणांना योग्य उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

45 दिवस फवारणी नकोच
फवारणी बाधितांना सुट्टी झाल्यानंतर सात दिवसांसाठी औषधोपचार देण्यात येतो. यामध्ये रुग्णांना विषबाधेचे लक्षणे आढळल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयामध्ये तातडीने उपचारास्तव जाण्याचा सल्ला देण्यात येतो. शिवाय पुढील 45 दिवस फवारणी न करण्याचे आवर्जून सांगण्यात येते.

loading image
go to top