25 वृक्ष लावून केले मुलाच्या जन्माचे स्वागत!

water
water

बाभूळगाव (जि. यवतमाळ)  : अपत्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यात मुलगा झाला तर सांगायलाच नको. पूर्वी मुलाच्या जन्माचा आनंद गावभर साखर वाटून साजरा केला जात असे. परंतु, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तालुक्यातील कोलही येथील काजळसरे दाम्पत्याने विविध प्रजातींची 25 झाडे लावून ते तीन वर्षे जगविण्याचा निर्धार करून आपल्या मुलाच्या जन्माचे स्वागत केले. 

संदीप व अंकिता काजळसरे यांच्या संसारवेलीवर अन्वेष नावाचे फुल 15 एप्रिलला उमलले. मुलाच्या जन्माचे स्वागत त्यांनी वेगळ्या पद्धतीने करायचे ठरविले. 25 झाडे लावून ती जगविण्याचा विचार त्यांच्या मनात आला. पर्यावरणातील बदलामुळे मानवी जीवन प्रभावित होत आहे. झाडांची कत्तल झाल्याने तापमानात वाढ झाली, पर्जन्यमान घटले. झाडे जगविणे हाच या ग्लोबल वार्मिंगवरील उपाय आहे. पुढील पिढीला हाच संदेश देता यावा म्हणून या दांपत्याने कोलही ते फळेगाव रोडवर 25 झाडे लावली. ती 2022 पर्यंत जगविण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. संदीप यांची स्वतःची माऊली नर्सरी आहे. त्यातील कडुनिंब,रेन्ट्री, गुलमोहर, करंज व सप्तपर्णी आदी विविध प्रजातीची रोपटे त्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावली. सर्वच झाडांना ट्री-गार्ड लावले. रोज झाडांना पाणी दिले जाते. त्यासाठी टाटा एसी गाडीवर 1500 लिटर पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. संदीप रोज झाडांना पाणी देतो. त्यांना त्यांची पत्नी अंकीताचे यासाठी प्रोत्साहनच मिळते. ही झाडे जगतील व भविष्यात माझ्या मुलासह इतरांना सावली देतील. बोडख्या झालेल्या रस्त्याचे सौंदर्य फुलवतील, असे संदीपला वाटते. या उपक्रमातून आम्हाला खूप आनंद मिळत असल्याचे काजळसरे दाम्पत्य सांगतात.

मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्जन्यमान घटले. दुष्काळ नित्याचाच झालाय. वाढत्या तापमानासह पाणीटंचाईचे चटके सर्वांना बसत आहे. यावर वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे. येणाऱ्या पिढीचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर प्रत्येकाने किमान 25 झाडे जगविली पाहिजे. वृक्ष संरक्षण ही चळवळ झाली पाहिजे.
- संदीप काजळसरे, रा. पो. कोलही, ता. बाभूळगाव, जिल्हा यवतमाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com