सीताबर्डीतील दुकानांच्या "ट्रायल रूम'ची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

नागपूर :  सीताबर्डीतील "फ्रेंड्‌स' कापडाच्या दुकानातील ग्राहक युवतीच्या अश्‍लील व्हिडिओ प्रकरणामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली. पोलिस उपायुक्‍तांच्या पथकाने सीताबर्डीतील मॉल्स, कापड दुकानांतील ट्रायल्स रूमची झाडाझडती घेतली. तसेच दुकानातील नोकरांचे पोलिस व्हेरिफिकेशन करण्यासाठी अर्ज करण्याचे आदेश दिले.

नागपूर :  सीताबर्डीतील "फ्रेंड्‌स' कापडाच्या दुकानातील ग्राहक युवतीच्या अश्‍लील व्हिडिओ प्रकरणामुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली. पोलिस उपायुक्‍तांच्या पथकाने सीताबर्डीतील मॉल्स, कापड दुकानांतील ट्रायल्स रूमची झाडाझडती घेतली. तसेच दुकानातील नोकरांचे पोलिस व्हेरिफिकेशन करण्यासाठी अर्ज करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन अग्रवाल (वर्धमाननगर) याच्या सीताबर्डी मेन रोडवरील "फ्रेंड्‌स' दुकानात नामांकित कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी ड्रेस खरेदीसाठी आल्या होत्या. ड्रेसची फिटिंग पाहण्यासाठी अग्रवालने ट्रायल रूममध्ये जाण्यास सांगितले. कपडे बदलत असताना युवतीची कुणीतरी व्हिडिओ क्‍लिप बनवीत असल्याचे लक्षात आले. तिने लगेच पोलिस कंट्रोल रूमला कॉल केला. ट्रायल रूमची झडती घेतली असता कपडे बदलताना अश्‍लील व्हिडिओ बनविल्याचे स्पष्ट झाले. किसन अग्रवाल आणि नोकर पिंटू चौथमल या दोघांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेवरून उपराजधानीत सामान्य नागरिकांमध्ये खदखद व्यक्‍त होत होती. पोलिस आयुक्‍त डॉ. उपाध्याय यांनी लगेच घटना गांभीर्याने घेतली. शहरातील मॉल्स, शोरूम आणि कापड दुकानांतील ट्रायल्स रूमची आकस्मिक झाडाझडती घेण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली. पोलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे ट्रायल रूममध्ये "स्पाय कॅमेरा किंवा हिडन कॅमेरे' ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आज सीताबर्डी पोलिसांनी इटर्निटी मॉल, एफबीबी आणि अन्य काही शोरूममध्ये अचानक भेटी दिल्या. ट्रायल रूमची झाडाझडती घेतली.
नोकर ठरला बळीचा बकरा
पिंटू चौथमल हा मालक किसन अग्रवालच्या "फ्रेंड्‌स' दुकानात नोकर होता. त्याला मालकाने मोबाईल दिला होता. त्या मोबाईलमध्ये मोठे स्टोरेज ठेवता येईल असे मेमरी कार्ड होते. पिंटू हा मालकाच्या सांगण्याप्रमाणे दुकानात काम करीत होता. मात्र, ट्रायल रूममध्ये मोबाईल ठेवून युवती व महिलांचे कपडे बदलण्याचे अश्‍लील व्हिडिओ बनविण्याचा आरोप केवळ पिंटूवर ठेवण्यात आला. त्यामुळे नोकराला बळीचा बकरा बनविण्यात आल्याची चर्चा आहे.
लाखोंची "सेटिंग' केल्याची चर्चा
ट्रायल रूममध्ये महिलांचे निर्वस्त्र फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासारख्या गंभीर गुन्ह्यात "फ्रेंड्‌स'चा मालक किसन अग्रवाल याला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली. मात्र, काही तासांतच त्याला जामिनावर सोडण्यात आले. सर्व आरोप नोकरावर ढकलून सीताबर्डी पोलिसांनी केवळ नोकराचे पोलिस व्हेरिफिकेशन न केल्याचा ठपका ठेवला. या प्रकरणात पोलिसांनी लाखोंची "सेटिंग' केल्याची चर्चा पोलिस दलात होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trial Room in shops of sitaburdi check