काँग्रेसच्या नेत्यांना भोवली बेजबाबदार वक्तव्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

‘गुन्हा दाखल करा’
आदिवासींचा अपमान करणाऱ्या या तिन्ही नेत्यांवर ‘ॲट्रासिटी’व्दारे गुन्हा दाखल करावा, अशी मागणी श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष पारोमिता गोस्वामी यांनी केली. चौकशी समितीच्या प्रमुख न्यायाधीश एस. जे. अन्सारी यांच्याकडे त्यांनी तक्रार केली.

वसतिगृहातील लैंगिक शोषण प्रकरण
नागपूर - आदिवासी विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे उघडकीस आल्यानंतर बेजबाबदार वक्तव्य करणे काँग्रेसच्या नेत्यांना आज चांगलेच महागात पडले. काँग्रेसचे विधानमंडळाचे उपगटनेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे आणि लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रतिमांना आदिवासी महिलांनी जोडे मारले आणि त्यांचे बॅनर जाळले. 

आदिवासी वसतिगृहातील चिमुकल्या विद्यार्थिनींवर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. सुभाष धोटे अध्यक्ष असलेल्या संस्थेतर्फे हे वसतिगृह चालविले जाते. धोटे, काँग्रेसचे विधानमंडळाचे उपगटनेते विजय वडेट्टीवार आणि लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी काल पत्रकार परिषदेत राजकीय स्वार्थासाठी काही लोक या प्रकरणाचा वापर करीत असल्याचा आरोप केला.नुकसानभरपाई मिळत असल्यामुळेच पालक तक्रारी करत असल्याचे धोटे म्हणाले. वडेट्टीवार यांनीही त्याला दुजोरा दिला. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आणि आज आदिवासी महिलांनी वडेट्टीवार, धोटे आणि धानोरकर यांच्या बॅनरवरील प्रतिमांना जोडे मारून संताप व्यक्त केला.

Web Title: Tribal Girl Sexual abuse Women Congress Leader