नक्षलवाद्यांच्या विरोधात एकवटले आदिवासी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

गडचिरोली - गेल्या अनेक वर्षांत नक्षलवाद्यांच्या क्रूरतेचे बळी ठरलेले आदिवासी आता त्यांच्या हिंसक कारवायांच्या विरोधासाठी एकवटले आहेत. निष्पाप आदिवासींना मारणे थांबवा, ज्यांना मारले त्यांच्या कुटुंबांना न्याय द्या, अशा घोषणाबाजी करीत संतप्त शेकडो नक्षलपीडितांनी सत्यशोधन समितीच्या सदस्यांना धारेवर धरले. 

गडचिरोली - गेल्या अनेक वर्षांत नक्षलवाद्यांच्या क्रूरतेचे बळी ठरलेले आदिवासी आता त्यांच्या हिंसक कारवायांच्या विरोधासाठी एकवटले आहेत. निष्पाप आदिवासींना मारणे थांबवा, ज्यांना मारले त्यांच्या कुटुंबांना न्याय द्या, अशा घोषणाबाजी करीत संतप्त शेकडो नक्षलपीडितांनी सत्यशोधन समितीच्या सदस्यांना धारेवर धरले. 

भामरागड तालुक्‍यातील बोरिया जंगल परिसरात चकमकीत 39 नक्षलवादी ठार झाले. या घटनेनंतर नक्षलसमर्थक, काही सामाजिक संघटना तसेच सत्यशोधन समितीकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. चकमकीबाबत सत्यता जाणून घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी सत्यशोधन समितीने बोरिया गावाला भेट दिली असता तेथे नक्षलपीडितांनी नक्षल संघटनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. नक्षलवाद्यामुळे आमची कुटुंबे उद्‌ध्वस्त झालीत, त्यांच्या भीतीने आम्हाला गाव सोडावे लागले, रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांत निष्पाप आदिवासींचे गळे चिरून हत्या केली जात आहे. हे थांबविण्यासाठी समितीने काय केले, असा प्रश्‍न नक्षलपीडितांनी समितीपुढे उपस्थित केला. 

सत्यशोधक म्हणे, चकमक बोगस... 
बोरिया जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी झालेली चकमक बनावट असून ग्रेनेडद्वारे हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप सत्यशोधन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले. मृतांच्या शरीरात गोळ्या का सापडल्या नाही, त्यांचे चेहरे विद्रूप का झाले, जीव वाचविण्यासाठी ते नदीतून गेले तर वैद्यकीय अहवालात त्यांच्या शरीरात पाणी का आढळले नाही, असा सवाल समितीने केला. 

समिती नक्षलसमर्थक 
नक्षल-पोलिस चकमकीच्या घटनेचा तपास करण्यासाठी आलेली सत्यशोधन समितीचे सदस्य नक्षलसमर्थक असून त्यांनी निष्पाप आदिवासींच्या हत्येबाबत कधीही नक्षलवाद्यांना जाब विचारला नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा बोगस संघटनेपासून सावध राहावे, असे आवाहन भूमकाल संघटनेचे अध्यक्ष प्रा. अरविंद सोवनी, सचिव श्रीकांत भोवते यांनी केले. 

Web Title: Tribal people gathered against the Naxalites