आदिवासीं म्हणाले... मेट्रोचा प्रवास विमानासारखाच! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पातील आदिवासींची नागपूर मेट्रोला ही तिसरी भेट होती. परंतु, यावेळी भामरागड भागातील कोडपे आणि तिरकामेटा या दोन अतिदुर्गम भागातील 35 आदिवासी महिला व पुरुषांनी प्रथमच नागपूर शहर बघितले. त्यातही रेल्वेने प्रवास त्यांच्यासाठी स्वप्नवतच. परंतु, गुरुवारी त्यांनी नागपूर मेट्रोतून प्रवासाचा आनंद लुटला.

नागपूर : गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी महिला व पुरुषांसाठी शहरात फिरणेही स्वप्नवतच. परंतु, त्यांनी नुकताच मेट्रोतून प्रवास केला अन्‌ अलगदपणे "हे तर विमानासारखेच आहे' असे उद्‌गार त्यांच्या ओठातून बाहेर पडले. प्रथमच मेट्रोतून प्रवासाचा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आला. 

हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पातील आदिवासींची नागपूर मेट्रोला ही तिसरी भेट होती. परंतु, यावेळी भामरागड भागातील कोडपे आणि तिरकामेटा या दोन अतिदुर्गम भागातील 35 आदिवासी महिला व पुरुषांनी प्रथमच नागपूर शहर बघितले. त्यातही रेल्वेने प्रवास त्यांच्यासाठी स्वप्नवतच. परंतु, गुरुवारी त्यांनी नागपूर मेट्रोतून प्रवासाचा आनंद लुटला. विमानातून कधी प्रवास केला नाही; परंतु मेट्रोतून प्रवासाने, तो प्रवासही असाच असेल, अशी प्रतिक्रिया यावेळी या आदिवासी नागरिकांनी व्यक्त केली. लोकबिरादरी प्रकल्पाच्या सदस्यांच्या पुढाकाराने आदिवासी बांधवांचा नागपूर दौरा आयोजित केला होता. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांनी गुरुवारी माझी मेट्रोला भेट दिली. हे सर्व आदिवासी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाशी जुळलेले आहेत. हेमलकसा, कोडपे आणि तिरकामेटा गावातील 35 आदिवासी महिला, पुरुष या दौऱ्यात सहभागी झाले होते. या आदिवासींना विकास, तंत्रज्ञान, कामाचे स्वरूप आदींची माहिती व्हावी, या उद्देशाने दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. साउथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपासून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन ते पुन्हा परत साउथ एअरपोर्ट स्टेशन असा त्यांनी प्रवास केला. रेल्वे स्टेशनवरील सजावट, सरकता जिना, इमारतीची स्थापत्यकला, मेट्रोमधील वातानुकूलित व्यवस्थेने त्यांना भुरळ घातली. त्यांनी सरकत्या जिन्यावरून चढण्याचे कसब क्षणात शिकून घेतले. प्रवासादरम्यान मेट्रोतील बैठक व्यवस्था, खिडकीमधून दिसणारी दुसऱ्या बाजूची मेट्रो रेल्वे, मधल्या भागात दिसणारी वनराई, उंच इमारती, शहराचे झगमगते, लोभसवाणे रूप बघून ते थक्क झाले. विमानतळ परिसरातून धावत्या मेट्रोतून त्यांनी विमानाचे उड्डाणही पाहिले. 

मराठीत साधला संवाद 
आदिवासी बांधवांची माडिया आणि गोंडी मुख्य भाषा आहे. परंतु, त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत मराठीत संवाद साधत माहिती घेतली. शहरात होऊ घातलेल्या मेट्रो प्रकल्पाचे आणि इतर आधुनिक विकासकार्य पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याचे मत आदिवासींनी व्यक्त केले. जंगलापलीकडचं आधुनिक जग पाहायला मिळाल्याचा आनंद होत असल्याचे ते म्हणाले. भविष्यात मेट्रोतून पुन्हा पुन्हा प्रवास करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal people say ... Metro travels like plane!