तापाने फणफणले आदिवासी विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

नागपूर : प्रतिकूल हवामानामुळे शहरात सर्वत्र तापाची साथ पसरली आहे. कळमना येथील आदिवासी वसतिगृहातील 30 ते 40 विद्यार्थी काही दिवसांपासून तापाने फणफणले आहेत. अनेकांनी अंथरूण पकडले असून, वसतिगृहात साथीचे रोग बळावले आहेत. परंतु, या विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यास वसतिगृहातील कर्मचारी, अधिकाऱ्यांना वेळच नाही.

आजारी विद्यार्थ्यांबाबत वसतिगृहाच्या गृहपालांना माहिती दिली असता त्यांनी याची दखल घेतली नाही. वरिष्ठांकडे तक्रार केली असता त्यांनीही याकडे कानाडोळा केल्याचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सांगितले. विदर्भातील आदिवासी क्षेत्रातील मुलांना योग्य शिक्षण मिळावे व त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, या उद्देशाने शासनाने सुरू केलेल्या निवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांची अवस्था फारच वाईट आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आणि आदिवासी विद्यार्थी संघटनांनी अनेकदा विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र, त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. नागपूर विभागात 13 आदिवासी वसतिगृह सुरू आहेत. परंतु, या वसतिगृहांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तेथे अनेक समस्या आहेत. कळमना परिसरातील वसतिगृहात 60 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांनाही समस्यांनी ग्रासले आहे. जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी वसतिगृहाची अवस्था अशीच आहे. याबाबत केलेल्या तक्रारीकडे मात्र आदिवासी विभाग फारसे गांभीर्याने घेत नाही. सरकार बदलल्यानंतर त्यात काही सुधारणा होईल, असे वाटत असताना गेल्या पाच वर्षांत काहीच सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal students, fever