विनोदातून चिरंतन वेदना मांडणारा साहित्यिक : पुरुषोत्तम बोरकर

borkar.
borkar.

साहित्यविश्वात अवघे आयुष्य वऱ्हाडी बोलीभाषेची पालखी समर्थपणे खांद्यावर ज्यांनी वाहिली, वऱ्हाडी बोलीभाषेतील मुखपरंपरा, तळागाळातील व्यथा कथांच्या माध्यमातून ज्यांनी जिवंतच केली नाही, तर अजरामर केली, असे "मेड इन इंडिया' ही अत्यंत लोकप्रिय कादंबरी महाराष्ट्रातील तमाम रसिकांना सुपूर्द करणारे लेखक आणि विनोदातून चिरंतन वेदना मांडणारे साहित्यिक म्हणजे स्व. पुरुषोत्तम बोरकर. आज त्यांच्या नावाअगोदर आपणास स्व. असे लिहावे लागत असले, तरी त्यांची साहित्यिक वाटचाल त्यांना सर्वांच्या आठवणींमध्ये जिवंत राहणार यात शंका नाही. खामगाव तालुक्‍यातील बोरगाव-बोऱ्हाळा गावाची जडणघडण बोरकरांनी अतिसूक्ष्म नजरेने न्याहाळली. निरीक्षण केल्याने ज्ञानात भर पडेलही; पण त्यातून साहित्यनिर्मिती होणे हे काही सोपे काम नाही.

गावगाडा कसा चालतो, हे प्रत्येकाच्या दृष्टीस पडत असते आणि त्याचे विस्मरण होते. परंतु, बोरकरांनी दररोज जे काही नवीन पाहिले, अनुभवले त्या ज्वलंत समस्यांकडे त्यांनी लिखाणातून लक्ष वेधले. हे साहित्य निर्माण करताना कुठलीही शंका मनात न बाळगता त्यांनी वऱ्हाडी भाषा निवडली. पश्‍चिम विदर्भात बोलली जाणारी वऱ्हाडी बोलीभाषा बोरकरांनी जोपासली, जोजवली, मोठी केली.

ग्रामीण जीवनातील कौटुंबिक हालचाली, माणसामाणसांतील सहसंबंध, नातेवाईक, जगण्याची गणिते, पारंपरिक स्थळे, वैचारिक देवाण-घेवाण, प्रसंग या वल्लीने सहज टिपले. माय सोडून मावशीच्या मागे धावल्याने दोघीही दुरावू शकतात हे त्यांच्या वेळीच लक्षात आले. या भूमिकेमुळे आज अनेक लेखकांचे ते आदर्श आहेत. पुरुषोत्तम बोरकर या अजब, अफाट रसायनाच्या हातून "मेड इन इंडिया' ही कादंबरी जन्माला आली. या कादंबरीला "कै. ल. मो. प्रभुणे' हा पुरस्कार मिळाला. इतरही पुरस्कार मिळाले; पण "मेड इन इंडिया'चा अस्सल गौरव ही कादंबरी लोकोत्तर झाल्याने वाढला.

या कादंबरीचे नाट्यरूपांतर करून 1990 ला आकाशवाणी केंद्र नागपूर येथून तीन महिने प्रसारण झाले. 1992 साली अकोल्यातील ज्येष्ठ नाट्यकलावंत दिलीप देशपांडे यांनी "मेड इन इंडिया'चा पहिला एकपात्री प्रयोग सादर केला. पुढे एकूण 980 प्रयोग झाले. सदर कादंबरीचा नायक पंजाबराव गरसोळीकर पाटील यांच्या माध्यमातून अस्सल वऱ्हाडी बोलीभाषेची समृद्धता जगाने अनुभवली. कादंबरीचे कथानक सर्वांना अगदी जवळचे, आपलेसे वाटणे हे खरे लेखकाचे यश आहे.

वरहाडातील रीतिरिवाज, सण-उत्सव, ग्रामीण संस्कृती, घरादारातील माणसांची सुख-दुःखे त्यांच्या लेखणीने अलगद पकडली. समाजातील विरोधाभास अत्यंत मिश्‍लीलपणे मांडला. हसवत हसवत वाचकांना, श्रोत्यांना अंतर्मुख करून डोळ्यांत पाणी आणण्याची कला बोरकरांच्या साहित्याने लीलया पेलली. राजकारणाची बाजू परखड स्पष्ट करणारी, राजकीय परिस्थितीचे तंतोतंत वर्णन करणारी कादंबरी म्हणून "आमदार निवास रूम नं. 1756' ही होय. तसेच "15 ऑगस्ट भागिले 26 जानेवारी' ही कादंबरीही चांगली गाजली. त्यांनी 10-15 चरित्रात्मक पुस्तकांचे लेखनही केले. "विठ्ठल झालासे कळस' हे चरित्रात्मक पुस्तक आहे. तर "इंद्रपुरीचा राणा'सह 49 पुस्तके व कादंबऱ्यांचे लेखन बोरकरांनी केले.

"होबासक्‍या ऊर्फ बांड्या पंचायती'च्या माध्यमातून पुरुषोत्तम बोरकर यांनी ग्रामीण भागातील इपित्तर नमुन्यांची भेट उभ्या महाराष्ट्राला करून दिली. तिर्मखभाऊ, होबासराव, लावालावी बुढी, सरकेलबाप्पू, चिक्कटमामी, व्हिडिओकॉनमावशी, इस्टारआबा, झीबुढी, नत्थू, नस्सटबुढी, खटखटमिया अशी रूपकात्मक पात्रे गावागावांत दिसू लागली. खेड्यापाड्यांतच नव्हे, तर शहरी भागातही ही पात्रे घराघरांत पोचली. संवादातील जिवंतपणा हे बोरकरांचे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. घटनांचा-पात्रांचा प्रवास कुटुंबातील लहान कुरबुरींपासून जागतिक पातळीवरील घडामोडीपर्यंत नकळत पोचला. लोकांचे भावविश्व "होबासक्‍या'तून उमटत असल्याने लोकसाहित्यिक व्हायला बोरकरांना अवधी लागला नाही. बोलीभाषेतून मारोतीचा पार, वावर, दुकाने, बाजारपेठा, राजकीय स्थळे इ. ठिकाणावरील खुमासदार संवाद साधत हिंदी-इंग्रजी पात्रांच्या मुखातील वापर खिळवून तर ठेवतोच; पण गुदगुल्या करत हसवतो. प्रसंगी रडवतोही. जगण्याचा धडाही आपसूक शिकवतो.

सहज विचारलेल्या प्रश्नांची अनाहुत, अचानक, विपरित, विनाझंझट उत्तरे जसे लेखक द्यायचे अगदी तसेच पात्रेसुद्धा देतात. रेखाटलेल्या पात्रांची संवादक्षमता पराकोटीची होती. "तुमच्या घरात दुसरं कोनी नाईबी इचिबहीन टाइम्स ऑफ इंडिया अन्‌ इंडिया टुडेच्या स्टॅंडरचं. मंग इंग्रजी पेपर वाचते तरी कोन?' "फेंगळा बैल वाचते टाइम्स ऑफ इंडिया अन्‌ माली भुर्की म्हैस वाचते इंडिया टुडे! काय म्हन्न हाय तुमचं..?' अशी सडेतोड प्रश्नोत्तरी बांड्यापंचायती दाखवते. वऱ्हाडी बोलीतील म्हणी, वाक्‍प्रचार पात्रांच्या सहजसुलभ संवादाला अलंकारिक करतात. मानवी प्रवृत्ती रेखाटताना पात्रे जितकी विनोदी, समंजस तितकीच हळवी आहेत. विनासायास आलेल्या संवादातील शिव्या साहित्याला लोकोत्तर करतात. सामाजिक अनिष्ट चालीरीतींना खतपाणी घालण्याचे काम बोरकरांचे साहित्य करत नाही. वाईट प्रथांचा बीमोड व्हावा हीच लेखकाची पवित्र आणि प्रामाणिक इच्छा निदर्शनास येते.

लोककवी डॉ. प्रा. विठ्ठल वाघ पुरुषोत्तम बोरकरांविषयी असे म्हणतात की, इतर ग्रामीण लेखकांप्रमाणे बोरकर "पूर्व दिव्यात' गटांगळ्या खात नाहीत. समकालीन लेखकांसाठी पुरुषोत्तम बोरकर सन्मित्र म्हणूनच वागत. मोठेपणाचा आव चेहऱ्यावर कधीच दिसला नाही. साहित्यक्षेत्राकडे वळणाऱ्या लिहित्या हातांना त्यांनी कधीच नाउमेद केले नाही. वऱ्हाडी बोलीभाषेवर त्यांचा खूप जीव होता. त्यांच्या सुविद्य पत्नी कर्करोगाने दगावल्या. स्वर्गवासी पत्नीच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातील नवोदित वऱ्हाडी साहित्यिकांना प्रेरणा मिळावी म्हणून वऱ्हाडीची "कोरीकंच्यांग बखर' हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह अकोला येथे त्यांनी स्वखर्चाने प्रकाशित केला. विमोचन सोहळ्याला डॉ. श्रीकांत तिडके, मिर्झा रफी अहमद बेग व तत्कालीन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील उपस्थित होते. "टांगा पलटी घोळमं फरार!' हे दोन अंकी एक नाटक नाट्यगृहात लावण्याचा त्यांचा मानस होता. वऱ्हाडीचे शिलेदार अभिनयात उतरण्यासाठी तयार होते. परंतु, त्याआधीच सुटाळा येथे त्यांचे देहावसान झाले. मराठी साहित्यविश्वावर आपला अमीट ठसा उमटवून साहित्यक्षेत्र पोरके करून आपल्यातून निघून गेले. स्व. पुरुषोत्तम बोरकर यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com