"ट्रिपल तलाक' कायद्यात शिक्षेची तरतूद योग्यच : आरीफ मोहम्मद खान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

नागपूर : केंद्र सरकारने संसदेत पारित केलेला ट्रिपल तलाक विरोधी कायदा महिलांच्या सक्षमीकरणासाठी असून सुधारणेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे त्यात असलेली शिक्षेची तरतूद योग्यच असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.

नागपूर : केंद्र सरकारने संसदेत पारित केलेला ट्रिपल तलाक विरोधी कायदा महिलांच्या सक्षमीकरणासाठी असून सुधारणेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे त्यात असलेली शिक्षेची तरतूद योग्यच असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री आरीफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातर्फे दीक्षान्त सभागृहात "अंडरस्टॅन्डिंग सेक्‍युलॅरिझम इन इंडिया' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सि. प. काणे होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, विशेष अतिथी माजी महापौर डॉ. कल्पना पांडे, विभागप्रमुख डॉ. निर्मलकुमार सिंग, डॉ. स्नेहा देशपांडे उपस्थित होत्या.
आरीफ खान म्हणाले, संसदेतील कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यात जर शिक्षेची तरतूद नसेल तर लोक त्याचे पालन करीत नाहीत. लोकांचे वागणे दुटप्पी असून समाजात आणि कोर्टात लोक वेगवेगळी भाषा बोलतात. त्यामुळे तिहेरी तलाक कायद्यात शिक्षेची तरतूद असल्यामुळेच लोक त्याचे पालन करतील असा विश्वास खान यांनी व्यक्त केला. लोकशाहीप्रणीत शासन व्यवस्था यांच्यातील अधिकार संघर्ष आणि मतभिन्नतेतून धर्मनिरपेक्ष हा शब्द अस्तित्वात आला. नंतरच्या काळात हा शब्द युरोपातून भारत आणि उर्वरित जगात प्रचलित झाला. परंतु, युरोपातील तत्कालीन परिस्थिती, मतभिन्नता आणि वैचारिक तफावतीतून जन्मलेल्या या शब्दाचा भारताशी तसा थेट संबंध नाही. मूळ गाभ्यातच धर्मनिरपेक्षता अंगभूत असल्यामुळे आम्हाला हा आयातीत शब्द आणि व्यवस्थेची फारशी गरज नसल्याचे खान यांनी सांगितले. यावेळी डॉ. विनायक देशपांडे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. निर्मलकुमार सिंग यांनी केले.
भारतीय संस्कृती वैविध्यपूर्ण आहे. या वैविध्यपूर्णतेचा आदर करणेच खरा "सेक्‍युलॅरिझम' आहे.
-आरीफ मोहम्मद खान, माजी केंद्रीय मंत्री

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Triple Divorce 'law : Arif Mohammad Khan