बंधारा तोडण्यावरून नरखेडमध्ये तणाव

नागपूर : कोल्हापुरी बंधाऱ्यावर संतप्त नागरिकांनी केलेली जाळपोळ.
नागपूर : कोल्हापुरी बंधाऱ्यावर संतप्त नागरिकांनी केलेली जाळपोळ.

नरखेड (नागपूर)  : मंदाकिनी नदीवरील पूल कम कोल्हापुरी बंधारा तोडण्याचा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा प्रयत्न उपाध्यक्षांसह काही सदस्यांनी हाणून पाडला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी नगराध्यक्षांच्या बंगल्यावर दगडफेक केली. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याने नरखेडमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
मंदाकिनी नदीवरील हा पूल कम कोल्हापुरी बंधारा तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल देशमुख यांनी तत्कालीन नगराध्यक्ष रमेश गुप्ता यांच्या मर्जीखातर पालिका हद्दीत तयार केला. काही महिन्यांअगोदर या पुलाच्या शेजारी दोन कोटी 18 लाखांचा मोठा पूल तयार करण्याची पालिकेची तरतूद होती. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. मात्र, नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांच्या बंगल्याचा कोपरा रस्ता रुंदीकरणातून वाचविण्यासाठी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी नवीन पूल रद्द केला. तसेच त्याचा निधी इतरत्र विकासकामांवर खर्च केल्याचे कळते.
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा पूल तोडण्याच्या प्रस्तावाला विरोध झाला. त्यानंतरही शुक्रवारी पुलावर पोकलेन चालविल्याने नगरसेवक व नागरिकांमध्ये खळबळ उडाली. पुलाची तोडफोड सुरू असताना राहुल गजबे यांनी मुख्याधिकाऱ्यांवर दगड उचलून त्यांना हाकलून लावले. यानंतर पुलावर जाळपोळ करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय जोगदंड, ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे व हक्क नियंत्रक पथकाने मुख्याधिकारी यांना पोलिस गाडीत नेले. यावेळी एकाने पोलिस वाहनावर दगड भिरकावल्याने वाहनाच्या काचा फुटल्या. याप्रसंगी तालुका भाजप अध्यक्ष श्‍यामराव बारई, गोपाल टेकाडे, माजी नगराध्यक्ष हेमलता टेकाडे, नगरसेवक संजय चरडे, शिवसेना नगरप्रमुख भारत अरमरकर, भाजप शहराध्यक्ष धनराज खोडे, प्रशांत खुरसंगे, सुरेश तातोडे व नागरिक उपस्थित होते.
मडावी यांना बडतर्फ करण्याची मागणी
संतप्त नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करून मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. मनोज कोरडे यांनी मडावी यांना तत्काळ बडतर्फ करावे व जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला. मोर्चेकऱ्यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाविरोधात नारे दिले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com