ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

खापरखेडा (जि. नागपूर) : पारशिवनी मार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 8:45 वाजता घडली. छगन रामकृष्ण काळे (वय 32, रा. शिंगोरी, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे.

खापरखेडा (जि. नागपूर) : पारशिवनी मार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 8:45 वाजता घडली. छगन रामकृष्ण काळे (वय 32, रा. शिंगोरी, ता. पारशिवनी) असे मृताचे नाव आहे.
छगन सकाळी मुलांना भानेगावच्या आर्या हार्ट स्कूल येथे दुचाकीने सोडून घरी जात होता. पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून घरी जात असताना त्याच मार्गावर एका पुलाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळशाच्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकी चेंदामेंदा झाली व त्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रकमध्ये फसलेली दुचाकी काढायलाच अर्धा तास कसरत करावी लागली. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांनी व मृताच्या नातेवाइकांनी गर्दी केली.
खापरखेडा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मात्र पोलिस तब्बल दीड तासाने पोहोचले. घटनास्थळावरील संतप्त नागरिकांनी तणावपूर्ण स्थिती निर्माण केली. मृतदेहाला येथून हलवायचे नाही व ट्रकचालक, मालक येणार नाहीत, तोपर्यंत मृतदेह हलणार नाही आणि मृताच्या परिवाराला मोबदला मिळायलाच पाहिजे असा पवित्रा घेत तणावसदृश स्थिती वाढत गेली. त्यामुळे जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करावे लागले. कालांतराने काही वेळात जमाव पांगविण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truck and bike accident news