भरधाव ट्रकने युवतीला चिरडले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

नागपूर : भरधाव ट्रक ओव्हरटेक करीत असताना दुचाकीस्वाराने रस्त्याच्या कडेला गाडी घेतली. मात्र, नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार तरुणी ट्रकच्या मागील चाकात चिरडली गेली. ही घटना नागपूर-कळमेश्‍वर मार्गावर गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या सफारी प्रवेशद्वाराजवळ घडली. मयूरी झोडापे (20, रा. फेटरी) असे मृत तर शुभम डोंगरे (17) असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूरी ही शुभमसह एमएच-31, डीई-1481 क्रमांकाच्या मोपेडने नागपूरवरून घरी फेटरी येथे जात होती. मोपेड शुभम चालवत होता. दुपारी तीन वाजताच्या सुमारास गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या सफारी प्रवेशद्वारापासून काही अंतरावर असताना मागून एमएच-31, सीबी-5937 क्रमांकाचा ट्रक भरधाव येत होता. ट्रकला जागा देण्यासाठी शुभम दुचाकी रस्त्याच्या कडेला घेत असताना काठावरून दुचाकीचे चाक घसरले. त्यामुळे दोघेही जमिनीवर पडले. शुभम हा डाव्या बाजूला पडला व मयूरी उजव्या हातावर पडली. ट्रकच्या मागील चाकात ती सापडली व चिरडली गेली. माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश गुरव, उपनिरीक्षक स्वाती यावले व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. शुभमवर उपचार सुरू आहे. गिट्टीखदान पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The truck crushed the girl