ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याने जमाव संतप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

खापरखेडा (जि. नागपूर) : पारशिवनी मार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. छगन रामकृष्ण काळे (वय 32, रा. शिंगोरी) असे मृताचे नाव आहे.

खापरखेडा (जि. नागपूर) : पारशिवनी मार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. छगन रामकृष्ण काळे (वय 32, रा. शिंगोरी) असे मृताचे नाव आहे.
छगन काळे सकाळी मुलांना भानेगावच्या आर्या हार्ट स्कुल येथे दुचाकीने सोडून घरी जात होता. पेट्रोलपंपवर पेट्रोल भरुन घरी जात असताना त्याच मार्गावर एका पुलाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळशाच्या भरधाव ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकी चेंदामेंदा झाली व त्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रकमध्ये फसलेली दुचाकी काढायलाच अर्धा तास कसरत करावी लागली. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांनी व मृताच्या नातेवाईकांनी गर्दी केली.
खापरखेडा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मात्र पोलिस तब्बल एक-दीड तासानंतर पोहोचले. घटनास्थळावरील संतप्त नागरिकांनी तणावपूर्ण स्थिती निर्माण केली. ट्रकचालक, मालक येणार नाही तोपर्यंत मृतदेह हलणार नाही आणि मृताच्या परिवाराला आर्थिक मदत मिळायलाच पाहिजे असा पवित्रा घेतला. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करावे लागले.
कालांतराने काही वेळात जमाव पांगविण्यात आला. मात्र संतप्त नागरिकांसह महिलांनी पोलिसांवर तीव्र नाराजी दर्शवली. अखेर सव्वाबारा वाजता मृतदेह घटनास्थळावरून नागपूरला मेयो रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आला. वृत्त लिहिस्तोवर ट्रकचालकाला अटक झालेली नव्हती. खापरखेडा पोलिस ट्रकचालक व मालकाचा शोध घेत आहेत.
पोलिस उपअधीक्षकांना धक्काबुक्की
जमाव पांगविण्याकरीता पोलिस उपअधीक्षक संजय पुज्जलवार घटनास्थली दाखल झाले. त्यांनी संतप्त नागरिकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त नागरिक व पोलिसांमध्ये वाद वाढून धक्काबुक्की झाली. यात पोलिस उपअधीक्षक संजय पुज्जलवार यांना नाकाजवळ किरकोळ मार लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truck crushed two wheeler rider