महामार्गावर ट्रक चालकाचा खून करुन दरोडेखोर फरार

अनिल दंदी
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

धुळे-कोलकाता महामार्गावरील एका ढाब्यावर बुधवारी रात्री दरोडेखोरांनी एका कंटेनरवर दरोडा टाकून चालकाला मारहाण करून लूटल्याची घटना आज (ता.06) उघडकीस आली. ही घटना पारस फाट्यावर घडली असून, यात दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत दरोडेखोरांनी दगडफेक करून एका ट्रक चालकाला जखमी केले. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरुध्द बाळापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

बाळापूर(अकोला): धुळे-कोलकाता महामार्गावरील एका ढाब्यावर बुधवारी रात्री दरोडेखोरांनी एका कंटेनरवर दरोडा टाकून चालकाला मारहाण करून लूटल्याची घटना आज (ता.06) उघडकीस आली. ही घटना पारस फाट्यावर घडली असून, यात दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या घटनेत दरोडेखोरांनी दगडफेक करून एका ट्रक चालकाला जखमी केले. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरुध्द बाळापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

विजय राय जगन्नाथ राय (अंदाजे वय 40) रा. (लुधियाना, पंजाब) असे मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. हा चालक एच आर 63 बी 6657 या क्रमांकाचा कंटेनर घेऊन खामगावकडे जात असताना पारस फाट्यावर असलेल्या जम्मू ढाब्यावर तो जेवणासाठी थांबला होता. बुधवारी रात्री साडे दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान ढाब्यावर जेवण करून तो कंटेनरकडे वळला असता अंदाजे पाच ते सहा दरोडेखोरांनी चालकावर हल्ला चढवला. त्यानंतर त्याने आरडाओरडा केला असता ढाब्यावर असलेल्या कामगारांनी त्याच्याकडे धाव घेताच दरोडेखोरांनी कामगारांवर दगडफेक केली. त्यानंतर ट्रकमध्ये शिरुन यातील काही दरोडेखोर ट्रकमधील सामान व त्याबरोबर असलेले वस्त्र महामार्गावरील एका शेतात घेऊन गेले.

दरम्यान दरोडेखोरांपैकी एकाने चालकाच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला. दरोडेखोरांनी कंटेनरच्या कॅबिनमधील काही रोकड लुटल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यानंतर दरोडेखोरांनी तेथूनच काही अंतरावर असलेल्या शिवनेरी ढाब्याकडे आपला मोर्चा वळविला. तेथे झोपलेल्या गोविंद शिक्रे याला चाकूचा धाक दाखवून थोडे फार पैसै व मोबाईल घेऊन दरोडेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, बाळापूर ठाणेदार गजानन शेळके, सहा. पोलिस निरीक्षक वैभव पाटील, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी व प्रचंड पोलिस ताफा घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Truck driver killed by robberer