अंत्यसंस्काराला गेले अन्‌ दुचाकी गमावून बसले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

गावातील एका व्यक्‍तीचे निधन झाल्यानंतर नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी गर्दी केली. काही पायी तर काही दुचाकींनी स्मशानभूमीच्या दिशेने निघाले. सर्वत्र शोकाकुळ वातावरण होते. मात्र, यावेळी मलब्यानी भरलेला दहाचाकी ट्रक उलटला आणि अपघात झाला. यात काही लोकांचा मृत्यू झाल्याची वार्ता पसरी अन्‌ गाव शोकाकुळ झाले. परंतु, या अपघातात कुणतीही जीवितहानी झाली नाही. 

तुमसर (जि. भंडारा) : तुमसरपासून वीस किलोमीटर अंतरावरील तुमसर-कटंगी मार्गावर असलेल्या राजापूर गावाजवळील एका गावातील व्यक्तीचे निधन झाले. यामुळे गावात शोककळा पसरली होती. सर्वत्र शोकमग्न नागरिक दिसून येत होते. तसेच अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर दुपारी अंत्ययात्रा राजापूर येथील स्मशानभूमीच्या दिशेने निघाली. मागे नागरिकांची रांग लागली होती. 


घटनास्थळी नागरिकांनी केलेली गर्दी 

तुमसर-कटनी महामार्गावरील राजापूर येथील स्मशानभूमीजवळ पोहोचल्यानंतर विसावा घेण्यात आला. यावेळी दुचाकीवर आलेल्या नागरिकांनी एका बाजूला एक अशा दुचाकी उभ्या करून स्मशानभूमीत शिरले. नागरिक अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत शिरले असता कटंगीकडून तुमसरकडे खनिज पावडर घेऊन येणारा दहाचाकी ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व दुचाकींवर कोसळले. 

Image may contain: 2 people, people standing and outdoor

या अपघातानंतर ट्रकमधील मलब्याखाली दुचाकींसह काहीजण दबल्याची वार्ता हवेसारखी गावात पसरली. वार्ता समजताच स्मशानभूमीकडे नागरिक मदतीसाठी धावून आले. या घटनेमुळे राजापूर गावात शोककळा पसरली होती. किती लोक मेले?, कोणाचा मृत्यू झाला असेल?, आपल्या घराचा व्यक्‍ती तर मृत पावला नसेल ना? असे सर्वजण अंदाज बांधत होते. मात्र, स्पष्ट उत्तर कुणालाही मिळत नव्हते. 

Image may contain: one or more people and outdoor
जेसीबीने मलबा काढताना 

नऊ दुचाकींचा पूर्णत: चुराडा

काही तासांनंतर मलबा जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आला. यावेळी नऊ दुचाकी त्याखाली दबल्या असल्याचे स्पष्ट झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे निष्यन्न होताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. या अपघातात नऊ दुचाकीचा पूर्णत: चुराडा झाला होता. तीन दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा नोंदविला आहे. 

 

हेही वाचा - कॉपर सलूनच्या उभारणीत डॉन आंबेकरचा पैसा! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The truck overturned in bhandara