महाराजाला चोपल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - तृप्ती देसाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

अमरावती/आसेगावपूर्णा - येलकी मठातील सीडी व्हायरल झाली. या प्रकरणी तपासयंत्रणेने दबावापोटी ठोस भूमिका घेण्याचे टाळले. परंतु, संबंधित महाराजाला चोप देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी बुधवारी अमरावतीत केला. त्यासाठी महिलांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अमरावती/आसेगावपूर्णा - येलकी मठातील सीडी व्हायरल झाली. या प्रकरणी तपासयंत्रणेने दबावापोटी ठोस भूमिका घेण्याचे टाळले. परंतु, संबंधित महाराजाला चोप देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी बुधवारी अमरावतीत केला. त्यासाठी महिलांनी रस्त्यावर उतरण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मठातील सीडीप्रकरणाची माहिती घेण्यासाठी त्या आज अमरावतीत दाखल झाल्या. येलकीला रवाना होण्यापूर्वी देसाई यांनी शासकीय विश्रामभवनात पत्रकारांशी संवाद साधला. ती चित्रफीत बाहेर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या महाराजावर गुन्हा दाखल करायला हवा होता. मंदिराचे पावित्र्य भंग करण्याचा हा प्रकार आहे. काळिमा फासणारी ही घटना असल्याने सरकारने मठाची मान्यता रद्द करावी. महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत त्या मठाला कुलूप ठोकावे; अन्यथा आपण कुलूप ठोकू, असा इशाराही त्यांनी दिला.

हिवाळी अधिवेशन विदर्भात सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी कारवाईचा आदेश द्यायला हवा होता. मठाची मान्यता रद्द करणे, महाराजाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविणे, मठाच्या संपत्तीची चौकशी करणे याबाबी आतापर्यंत तपासयंत्रणेने का केल्या नाहीत, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. मठातून पळ काढण्यासाठी पोलिसांनीच महाराजाला मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला. उपविभागीय महिला तपास अधिकाऱ्यांकडूनही प्रतिसाद मिळत नसून; विद्यमान तपास अधिकारी प्रकरणाचा तपास करण्यात सक्षम नसल्याचा आरोप त्यांनी केला. राजकीय शक्ती आणि येथील त्या महिलांनी महाराजास पाठीशी घातल्याचेही त्या म्हणाल्या.

आधी अडविले; नंतर सोडले!
तृप्ती देसाईंसोबत येलकी मठातील भेटीदरम्यान संघटनेच्या सात ते आठ स्थानिक महिला होत्या. सर्वांना आत जाऊ द्या, अशी मागणी त्यांनी रेटली. सुरवातीला पोलिसांनी त्यांना अडविले; त्यानंतर वीस मिनिटांनी आत सोडले.

कुलूप तोडण्याचा प्रयत्न
मठ परिसरात प्रवेश करताच महिलांनी महाराजाला शोधण्याचा प्रयत्न केला. एका खोलीला कुलूप होते. ते दगडाने तोडण्याचा प्रयत्न देसाई यांनी केला. पोलिसांची आडमुठी भूमिका बघून मठ परिसरात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

समर्थकांच्याही घोषणा
येलकी मठ परिसरात तृप्ती देसाई व त्यांच्या समर्थकांनी पाहणी केल्यानंतर त्या मठाबाहेर पडल्या. मुख्य प्रवेशद्वारासमोर महाराजांचे समर्थक होते. त्यांनी भूमाता ब्रिगेडच्या महिलांसमोर महाराजांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने तणाव निर्माण झाला होता.

झटापटीत युवक जखमी
भूमाता ब्रिगेडच्या समर्थक मठाबाहेर आल्या. त्याचवेळी राहुल विजय पुढारे (वय 30, रा. मार्की) हा युवक तेथे थांबला. राहुलने देसाईंचे समर्थन केले; त्यामुळे महाराज समर्थक चिडले. त्याच्याशी झटापट झाली. त्यात तो किरकोळ जखमी झाला. मारहाण झाल्याची तक्रार त्याने आसेगाव ठाण्यात नोंदविली.

चित्रीकरणाच्या खोलीची पाहणी
मठातील ज्या स्नानगृहात चित्रीकरण करून सीडी तयार झाली, त्या ठिकाणची पाहणी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी केली. येथील काही सामग्री बाहेर काढून ठेवण्यात आलेली होती; तर जेथे कॅमेरा लावल्याचे सांगितले गेले; तेथील वायर तुटलेले दिसलेत.

2 फोटो : (एएमआर 07पी- येलकी 02) ः येलकीपूर्णा : मठाच्या प्रवेशद्वारासमोर अडविल्यानंतर घोषणाबाजी करताना तृप्ती देसाईसह अन्य महिला.

Web Title: trupti desai warning to maharaj