हा स्वतःला प्रकाशझोतात ठेवण्यासाठीचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

- तृप्ती देसाई यांच्या तक्रारीवर सतीश व्यास प्रतिक्रिया 
- त्यांनीच कडू यांना उलटसुलट बोलून गुन्हा केला दाखल 
- आमदार बच्चू कडू यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही 

अमरावती : स्वतःला प्रकाशझोतात ठेवण्यासाठी असला उपद्रव तृप्ती देसाई नेहमीच करीत असतात. आमदारांमधून केवळ काम करणाऱ्या आमदारांविषयी फेसबुकवर लिहिणे कितपत योग्य आहे? बच्चू कडू यांनी व्यस्ततेमुळे फोन उचलला नाही. नंतर मात्र स्वतः केला असता त्यांनीच कडू यांना उलटसुलट बोलून स्वतःच गुन्हा दाखल केला. हे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया प्रहारचे अचलपूर येथील पदाधिकारी सतीश व्यास यांनी व्यक्‍त केली. 

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आमदार बच्चू कडू यांच्याबाबत केलेल्या फेसबुक पोस्टमुळे निर्माण झालेला वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. कडू यांनी आपल्याला धमकी दिल्याची तक्रार धनकवडी पोलिस चौकीत देसाई यांनी दाखल केली आहे. विदर्भातील शेतकरी अडचणीत असताना कडू हे भाजप व शिवसेनेच्या विरोधात आंदोलन का करीत नाहीत, अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. कडू समर्थकांनी अर्वाच्य भाषेत त्यांचा समाचार घेतला होता. या पार्श्वभूमीवर देसाई आणि कडू यांच्यात भ्रमणध्वनीवर संभाषण झाले होते. त्या संवादात कडू यांनी धमकी दिल्याचा आरोप देसाई यांनी करून तशी तक्रार शुक्रवारी सायंकाळी दाखल केली आहे. 

तुम्ही मला फेसबुकवर उपदेश करू नका. स्वतःला मोठे समजू नका. शहाणपणा करू नका; अन्यथा तुम्हाला परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिल्याबाबत हा गुन्हा दाखल केला असल्याचे तृप्ती देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याबाबत आमदार बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Try to keep yourself in the spotlight