esakal | तुकाराम आखाड्यात आजही जपली जाते गुरुशिष्य परंपरा
sakal

बोलून बातमी शोधा

tukaram

मूळ सातारा येथील रहिवाशी तुकाराम वस्ताद यांनी अनेक नामवंत मल्लांना चारीमुंड्या चीत केले. त्यांचा हा पराक्रम पाहून अमरावतीभूषण दादासाहेब खापर्डे यांनी तुकाराम वस्तादांना अमरावतीत आणले. 1896 रोजी विजयादशमीच्या पर्वावर त्यांनी तुकाराम आखाड्याची स्थापना केली. काही दिवसांतच या आखाड्याची कीर्ती चारही दिशांना पसरू लागली.

तुकाराम आखाड्यात आजही जपली जाते गुरुशिष्य परंपरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावती शहर अनेक ऐतिहासिक वास्तुंचे आणि घटनांचे साक्षीदार आहे. ऐतिहासिक परकोटाच्या आतील भाग म्हणजेच अंबागेटच्या आतील अनेक ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक असलेल्या तुकाराम आखाड्याला वर्षानुवर्षे गुरुशिष्य परंपरा लाभली आहे. विशेष म्हणजे आजच्या आधुनिक काळातसुद्धा ही परंपरा कायम आहे.

मूळ सातारा येथील रहिवाशी तुकाराम वस्ताद यांनी अनेक नामवंत मल्लांना चारीमुंड्या चीत केले. त्यांचा हा पराक्रम पाहून अमरावतीभूषण दादासाहेब खापर्डे यांनी तुकाराम वस्तादांना अमरावतीत आणले. 1896 रोजी विजयादशमीच्या पर्वावर त्यांनी तुकाराम आखाड्याची स्थापना केली. काही दिवसांतच या आखाड्याची कीर्ती चारही दिशांना पसरू लागली.

स्व. माधवराव गुर्जर, श्रीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे संस्थापक स्व. अंबादासपंत वैद्य, त्यांचे बंधू बाबूराव वैद्य, गोविंद फुले, अशी अनेक नामवंत मंडळी या आखाड्यात येऊ लागली. येथूनच खऱ्या अर्थाने येथील गुरुशिष्य परंपरेला सुरुवात झाली. आखाड्यातील लाल मातीशी सर्वधर्मीय तरुण जुळू लागले होते. त्यानंतर बाबू पवार, प्रकाश संगेकर, राजाभाऊ सरदार, मनोगर केने, बंडू पवार, विलास तेटू आदींनी वर्गणी गोळा करून आखाड्यावरील टीनपत्रे काढून त्यावर स्लॅब टाकला.

तुकाराम वस्ताद यांनी स्थापन केलेल्या तुकाराम आखाड्याची धुरा नंतर बापू तुकाराम पवार यांनी यशस्वीपणे सांभाळली आणि सध्या त्यांचा मुलगा लक्ष्मण बापूराव पवार हे या आखाड्याचे सर्वेसर्वा असून आजही गुरुशिष्य परंपरा कायम आहे. 1984 पासून खऱ्या अर्थाने या आखाड्याचे स्वरूप बदलण्यास सुरुवात झाली.

जाणून घ्या - मध्यरात्री कोविड केअर सेंटरमध्ये माजली खळबळ; काय झाले असे?

अनेक तरुणांनी मिळविला नावलौकिक
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे संस्थापक स्व. अंबादासपंत वैद्य हे तुकाराम वस्ताद यांचा गुरू म्हणून उल्लेख करीत असत. विशेष म्हणजे स्वतंत्रता आंदोलनातील सेनानी पन्नालाल व्यास, शिवाजीराव पटवर्धन, वीर वामनराव जोशी हेसुद्धा तुकाराम आखाड्यातील गुरुशिष्य परंपरेचे साक्षीदार राहिल आहेते. आज तुकाराम वस्ताद यांचे नातू लक्ष्मण बापूराव पवार हे या आखाड्याची धुरा सांभाळत असून त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या अनेक तरुणांनी शरीर सौष्ठव स्पर्धांमध्ये नावलौकिक मिळविला आहे