esakal | योग्य आहार, सकारात्मक विचार कोरोनाला नक्की संपवतील, जाणून घ्या काय सांगतात राष्ट्रसंत... 
sakal

बोलून बातमी शोधा

Tukdoji Maharaj says, proper diet, positive thoughts will definitely end the corona

कोरोनासारखी महामारी ही जगाने त्यातल्या त्यात भारताने पहिल्यांदा पाहिली नाही. साथीचे लागट रोग गावच्या गाव उद्धवस्त करायचे.  गावेच्या गावे स्मशान बनायची. पण, विज्ञानाने त्यावर मात केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत ‘ग्राम-आरोग्य' नावाचा अध्याय लिहितात. त्यातील विचार कोरोनाच्या संसर्गाला थांबवण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतात.

योग्य आहार, सकारात्मक विचार कोरोनाला नक्की संपवतील, जाणून घ्या काय सांगतात राष्ट्रसंत... 

sakal_logo
By
अतुल मांगे

नागपूर : आज कोरोनामुळे प्रत्येक जण भयभीत आहे. दररोजची वाढती रुग्णसंख्या, मृत्यूसंख्या काळजाचा ठोका चुकवते. प्रत्येक जण आपापल्या परीने कोरोनापासून स्वतःला वाचवत असले तरी प्रत्येकाच्या मनात भीती, दडपण, चिंता आहे. अशावेळी औषधोपचार आपले काम करतील, त्यासोबतच मनाची अवस्था, आंतरिक कणखरपणा असणे गरजेचे आहे. तुकडोजी महाराज यांनी मनुष्याच्या प्रत्येक चिंतेचे कारण आणि त्यावर उपाय सांगितला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधारेचे अभ्यासक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी राष्ट्रसंतांचे विचार, मार्गदर्शनच कोरोनारूपी राक्षसापासून प्रत्येकाचा बचाव करतील, असे सांगितले. एवढेच नव्हे तर महाराजांनी आपल्या ग्रामगीतेतून ते सोदाहरण पटवून दिल्याचे रक्षक सांगतात. जाणून घेऊया त्यांच्याच शब्दांत...  
     
रक्षक सांगतात, कोरोनासारखी महामारी ही जगाने त्यातल्या त्यात भारताने पहिल्यांदा पाहिली नाही. साथीचे लागट रोग गावच्या गाव उद्धवस्त करायचे.  गावेच्या गावे स्मशान बनायची. पण, विज्ञानाने त्यावर मात केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत ‘ग्राम-आरोग्य' नावाचा अध्याय लिहितात. त्यातील विचार कोरोनाच्या संसर्गाला थांबवण्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतात. महाराज ग्रामगीतेत लिहितात...

हेही वाचा - वीज ग्राहकांनो लक्ष द्या! अचूक वीजबिल हवंय? मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..
 

देवी-देवतांचा कोप झाला। कॉलरा-पटकीचा झटका आला।
म्हणजे सुधारूच न शके कोणाला। बाप वैद्याचा ॥ ३॥ग्रा.अ. १४
मित्रा! ऐक याचे उत्तर। देव-देवता किंवा परमेश्वर।
हे कृपेचेचि अवतार । कोपचि नाही त्याठायी ॥५॥ 

जेव्हा समाज शिक्षणापासून वंचित होता तेव्हा अशा महामारींना तो देवाचा कोप समजून दगडाच्या देवांना कोंबड्या-बकऱ्यांचा बळी द्यायचा. पण, आजही सुशिक्षित समाजातील नागरिक भोंदुबाबांच्या चर्चा करताना दिसतात. कोरोनाची लागण वाढविण्यात कोण जबाबदार? याची वारेमाप चर्चा प्रसिद्धी माध्यमातून लॉकडाऊनपासून सातत्याने सुरू आहे. त्याला धार्मीक रंग देण्याचा प्रयत्न झाला. अरे कोरोना मानवी संहारासाठी आवासून उभा असताना मानवी मनातली भीती दूर करणे, सकारात्मक विचारातून आत्मबल वाढवणे गरजेचे आहे.

आज रुग्ण रोगाने कमी भीती आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे दगावत आहे. काल देवाचा कोप समजून लोक हतबल व्हायचे. आज विज्ञान, योगा, विपश्यना सोबतीला आहेत. योग्य आहार, विहार सांभाळा, सकारात्मक चिंतन करा कोरोना जवळ येण्याची हिंमत करणार नाही. याबाबत राष्ट्रसंत ग्रामगीतेत सांगतात,
चहुबाजूंनी केली घाण । त्यात जंतु झाले निर्माण ।
त्यातूनि रोगांच्या साथी भिन्न भिन्न । वाढ घेती॥८॥ ग्रा.अ. १४
नाही नेमाचा आचार । शुध्द नाही आहार -विहार ।
अशुध्द हवा-पाणि, संहार । करिती जनांचा ॥९॥ ग्रा. अ.१४

आज प्रदुषणाच्या विळख्यात आपण जगतो आहे, हा धोका राष्ट्रसंतांनी तेव्हा ओळखला होता. ते म्हणतात-
काही केव्हां कुठेहि खाणे । कधी झोपणे, कधी जागणे ।
सप्तहि धातु कोपती याने । रोगरूपाने फळा येती ॥ १०॥ ग्रा.अ.१४
'हॉटेली खाणे, मसणा जाणे' । ऐसे बोलती शहाणे ।
त्यावरि नाना तिखट व्यसने। आग्यावेताळा सारिखी ॥११॥ ग्रा.अ. १४

फास्ट फुड, घरपोच फुडपॅकेट, अति मांसाहार यामुळे आरोग्य बिघडते. घरचा आहार त्यात प्रेमाचा सात्वीकपणा असतो, हे विज्ञान आपण समजून घ्यावे. खोट्या जाहिरातीत अडकू नका.

अधिक माहितीसाठी - कुंभ मेळा संपल्यानंतर नागा साधू कोठे जातात? 
 

कशास काही नियम नुरला । कोण रोगी कोठे थुंकला?।
कोठे जेवला, संसर्गी आला। गोंधळ झाला सर्वत्र ॥१२॥ ग्रा.अ. १४
त्याने रोगप्रसार झाला। लागट रोग वाढतचि गेला।
बळी घेतले हजारो लोकांला । वाढोनि साथ ॥१३॥ ग्रा.अ.१४

आज खर्रा-घुटका या व्यसनाने कहर केला आहे. कुठेही थुकणे, पिचकाऱ्या मारणे यातून कोरोना रोगाचा मोठा प्रसार होत आहे. हे व्यसनी थुंकणारे स्वतःसोबत इतरांचा जीव घेतात. अशा थुंकणाऱ्यांवर कायद्यासोबतच सामाजिक बहिष्कार टाकण्याची मोहीम राबविण्यात यावी. ती सामाजिक चळवळ व्हावी.

नियमांचा मुख्य आधार । मजबूत पाहिजे निर्धार ।
त्यावरीच उत्कर्षाची मदार। ऐहिक आणि आध्यात्मिक ॥२५॥ ग्रा.अ. १४
नाहीतरि मानवाने नियम केले । सर्व जीवन सुरळीत चाले।
परि एकदा दुर्लक्ष झाले । की चुकतचि जाते ॥२६॥ ग्रा. अ. १४

स्वतःची जबाबदारी जाणून वागा
तुकडोजी महाराजांनी अतिशय साध्या, सोप्या, सहज शब्दात जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आहे. त्यांनी सांगितलेले विचार आत्मसाद करण्यास सोपे, सहज आहेत. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी राष्ट्रसंतांच्या विचारांनुसार स्वतःची जबाबदारी जाणून सजग, सतर्क राहणे गरजेचे आहे.  
:ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक
अभ्यासक राष्ट्रसंत तुकडोजी विचारधारा 

loading image
go to top