तुमसर झाले कचऱ्याचे शहर...सांगा कशी नांदेल स्वच्छता...नगरपालिका दखल घेईल काय?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

शहरात ठिकठिकाणी कचरापेटीच्या बाहेर पडून घनकचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसून येत आहेत. त्यात मोकाट गुरे चारा शोधून कचरा विखुरतात. यामुळे परिसरात कचरा व घाण पसरलेली दिसते. याबाबत नागरिकांनी संबंधित नगरसेवक व नगर परिषदेच्या सफाई विभागात तक्रारी केल्या. परंतु, नगर परिषद प्रशासन त्याची दखल घेत नाही. या सर्व बाबींमुळे शहरात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

तुमसर (जि. भंडारा) : पावसाळा सुरू झाला असून शहरामध्ये ठिकठिकाणी कचरापेटीच्या बाहेर घनकचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

उन्हाळ्याच्या शेवटी शहरामध्ये मॉन्सूनपूर्व कामे केली जातात. यातून नागरी वस्त्यांत स्वच्छतेबद्दल नियोजन केले जाते. तसेच गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे याबाबत स्वच्छता, नाल्यांची सफाई, सांडपाण्याचा निचरा आदींची काळजी घेतली जाते. परंतु, तुमसर शहरामध्ये यावर्षी पावसाळा सुरू होऊनही सफाईची कामे झालेली दिसत नाहीत.

शहरात ठिकठिकाणी कचरापेटीच्या बाहेर पडून घनकचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसून येत आहेत. त्यात मोकाट गुरे चारा शोधून कचरा विखुरतात. यामुळे परिसरात कचरा व घाण पसरलेली दिसते. याबाबत नागरिकांनी संबंधित नगरसेवक व नगर परिषदेच्या सफाई विभागात तक्रारी केल्या. परंतु, नगर परिषद प्रशासन त्याची दखल घेत नाही. या सर्व बाबींमुळे शहरात नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

कंटेनरच्या बाहेरही कचरा

शहरातील मुक्ताबाई कन्या शाळेजवळ एक कचरा कंटेनर ठेवले आहे. जिथे जवळपासच्या परिसरातील नागरिक कचरा टाकतात. आधी कंटेनर भरल्यावर सफाई केली जात होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कंटेनर तुडुंब भरून कचरा पसरलेला आहे. आता मोकाट जनावरांमुळे कचरा विखुरला जात आहे. याबाबत नगरसेवकांकडे तक्रार केली असता ठेकेदार बरोबर काम करीत नाही, असे ते सांगतात.

नागरिकांच्या आरोग्याला धोका

भाजीबाजारामध्ये मोरभवन समोर ठेवलेले कंटेनर भरून कचरा बाहेर पडलेला आहे. आता हा कचरा रस्त्यावर पसरलेला आहे. अशा परिस्थितीमुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याचा धोका असूनही नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

जाणून घ्या  : भंडारा जिल्ह्यातील नंदा, कान्हा गवळी मंदिर आणि त्याची परंपरा

अर्धे तुम्ही अर्धे आम्ही

शहरातील घनकचरा उचलण्याचे कंत्राट नगर परिषदेने दिलेले आहे. यातील कंत्राटदाराला महिन्याकाठी बारा लाख रुपयांच्या जवळ रक्कम दिली जाते. शासनाचे इतका खर्च होऊनही शहरात स्वच्छता राहत नसेल तर, कंत्राट देण्याचा उपयोग काय, असा प्रश्‍न आहे. परंतु, काम न करताच अर्धे अर्धे असा हिशेब सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे शहरांत मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे. आता पाऊस सुरू झाल्यावर आणखी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. नगर प्रशासनाने आजाराची साथ येण्याआधी स्वच्छतेचा मंत्र स्वीकारावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tumsar has become a city of garbage