
Buldana : तुपकर यांचे आत्मदहन आंदोलन चिघळले
बुलडाणा - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेता रविकांत तुपकर यांनी आज ११ फेब्रुवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज दुपारी दीड वाजता पोलिसाचा वेश घेऊन तुपकर कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले. त्यांच्या सभोवताल असणारा कार्यकर्त्यांच्या गराड्यात त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेतले. यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊन आंदोलन चिघळले.
दरम्यान संतप्त झालेले शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि आपल्या न्याय हक्कासाठी जमलेले शेतकरी आक्रमक होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर असणाऱ्या पोलिस पथकांशी भिडले. यावेळी पोलिस पथकांनी सौम्य बळाचा वापर करून परिस्थिती आटोक्यात आणली.
यावेळी तब्बल चार तास रविकांत तुपकर आणि पत्नी शर्वरीताई तुपकर यांच्यासह महिला कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आंदोलन कर्त्यांचे समाधान व्हावे यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डांबरे यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला मात्र मागण्या संदर्भात ते उपस्थित आंदोलन करण्याचे समाधान करू शकले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी चीड निर्माण झाली.
चार तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्था विस्कळित होताना पाहून पोलिसांनी तुपकरांची समजूत काढण्याचा आणि आंदोलन मागे घेण्याचा बाबत चर्चा केली. मात्र तुपकर मानाला तयार नव्हते. यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करून तुपकर यांना आंदोलन स्थळावर वरून उचलून पोलिस व्हॅनमध्ये टाकून अटक केली. यादरम्यान पोलिस आणि संतप्त झालेल्या कार्यकर्ते यामध्ये धक्काबुक्की झाली.
पत्रकारांवरही लाठी
पत्रकारांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या विरोधात बुलडाणा शहरातील पत्रकारांनी स्थानिक पोलिस स्टेशन समोर धरणे आंदोलन चालू केले आहे. रविकांत तुपकर यांचे आंदोलन चालू असताना पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला.
यादरम्यान वार्तांकन आणि व्हिडिओ शूटिंग करणार असताना पोलिसांनी काही टीव्ही मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या काही पत्रकारांवर ही लाठी चालवली. शहरातील अवैध धंद्यांना आळा न घालू शकणारे पोलिस प्रशासन पत्रकारांवर लाठीचार्ज करून आपले कर्तव्यसिद्ध करत आहे का ? असा आरोप यावेळी पत्रकारांकडून केला जात आहे.
जोपर्यंत मुख्यमंत्री व पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी पत्रकारांना न्याय देत नाही, तोपर्यंत पोलिस स्टेशनपुढून उठणार नाही, अशी भूमिका पत्रकारांनी घेतली आहे.
तुपकरांची प्रकृती बिघडली
दुपारी दीड वाजता आंदोलन सुरू झाल्यानंतर कमालीची ऊन तापली होती. तब्बल चार तास आंदोलन चालू होते. यादरम्यान घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा गराडा शिवाय अंगावर ओतलेले डिझेल यामुळे तुपकर यांना भोवळ आली आणि त्यांची प्रकृती बिघडली. यावेळी बऱ्याच वेळ ते खाली पडून होते.
शेतकऱ्यांना व कार्यकर्त्यांना झाली जबर दुखापत
रविकांत तुपकर महिला कार्यकर्ते आणि शेतकरी यांना पोलिसांकडून ताब्यात घेत असल्याचे पाहून सभोवताली जमलेले कार्यकर्ते आक्रमक झाले यावेळी त्यांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली एकंदरीत परिस्थिती तणावपूर्ण होऊन वातावरण चिघळण्याची भीती होत
असताना पोलिस दलातील दंगा काबू पथक आणि लाठेच्या युनिट हे ॲक्शन मोडवर येऊन यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यास सुरवात केली यादरम्यान कार्यकर्ते व शेतकरी इतरत्र पळू लागले अनपेक्षित झालेल्या लाठीचार्जमुळे काही शेतकऱ्यांना व कार्यकर्त्यांना जबर दुखापत झाली तर पळताना खाली पडून काही किरकोळ जखमी झाले.