तूर तारणार

 Tur (Arhar) crop will give benefit to farmers
Tur (Arhar) crop will give benefit to farmers

अकोला : अतिवृष्टीने खरीप उद्‍ध्वस्त केला असला तरी, खरिपातील डौलदार तूर मात्र, शेतकऱ्यांना तारणार असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यासह विदर्भात दिसून येत आहे. सोबतच पिकांना पोषक वातावरण आणि कीड आटोक्यात असल्याने, रब्बी सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याचे भाकित कृषी तज्ज्ञांकडून केले जात आहे.

सतत तीन वर्षापासून नैसर्गिक, अनैसर्गिक कोपातून जिल्ह्यातील शेती नुकसानात जात असून, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट होत आहे. यावर्षी मात्र हवामान विभागाने वर्तविलेल्या, जूनच्या पहिल्या आठवड्यातच मॉन्सूनचे आगमन आणि पिकांना लाभदायक पाऊस पडणार असल्याच्या शक्यतेनुसार शेतकऱ्यांच्या अपेक्षांना बळ मिळाले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी खरिपाची जोरदार तयारी सुद्धा केली. मात्र मॉन्सूनचे आगमन महिनाभर उशिरा झाल्याने, सर्व तयारीवर पाणी फेरले. पेरणी केल्यानंतरही दीड महिना पावसाने दांडी मारली आणि शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च सोसायला भाग पाडले. एवढ्यावरच निसर्गाचा प्रकोप थांबला नाही तर, ऑगस्ट ते ऑक्टोबर अखेरपर्यंत सतत पावसाने अकोलेकरांना झोडपून काढले आणि अतिवृष्टीच्या तडाख्यात मूग, उडीद, सोयाबीन भूईसपाट करून टाकले. खरिपातील मुख्य पिके हातातून गेल्याने, शेतकऱ्यांची स्थिती अधिक खालवली आणि केवळ तूर, कपाशीवर भीस्त उरली. अतिवृष्टीमुळे खरिपातील मुख्य पिकांतून शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नसले तरी, सध्या पोषक वातावरण मिळाल्याने खरिपातील तूर मात्र शेतात डौलत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपातील अपेक्षा निदान तूर तरी पूर्ण करेल, असा आशादायी अंदाज कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

फक्त कीड नियंत्रणाचे व्यवस्थापन करा
सध्या तुरीचे पीक चांगल्या स्थितीत असून, नुकत्याच पडलेल्या पावसाच्या सरींनी पिकावरची कीडही गळून पडली आहे. त्यामुळे तुरीपासून यंदा चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु, वातावरणातील बदलामुळे पुन्हा कीडीचे आक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कीड नियंत्रणाचे योग्य व्यवस्थापन करून, शिफारसीनुसार फवारणी काढण्याचा सल्ला, कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

हरभरा, गव्हाला वातावरण पोषक
ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस लाबंल्याने व सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने, जमिनाला चांगली ओल आहे. शिवाय दोन दिवसांपूर्वी पावसाच्या सरी पडल्याने, गहू, हरभऱ्याला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रब्बीतील ही दोन मुख्य पिके सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा देतील, अशी अपेक्षा केली जात आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com