विभागीय आयुक्तांच्या दालनात ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

अमरावती -शेतकऱ्यांकडील तूर हमीभावाने खरेदी करण्यात यावी, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली तूर सरकारला विकण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात यावा, या  मागणीसाठी आमदार बच्चू कडू व त्यांच्या समर्थकांनी विभागीय आयुक्तांच्या दालनात आज, मंगळवारी दीड तास ठिय्या आंदोलन केले.

शेतकऱ्यांकडील तूर खरेदी करण्याचे टाळले जात आहे. सरकारचा हा निर्णय शेतकरीविरोधी  आहे, असे सांगत तूरखरेदी पूर्ववत सुरू न ठेवल्यास मंत्र्यांच्या घरात तुरीचे कुटार भरण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ युवाशक्ती संघटनेतर्फे देण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या राठीनगर येथील निवासस्थानी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता; मात्र आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी थेट विभागीय आयुक्तांच्या कक्षात येऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. 

विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी शासकीय पातळीवर पत्रव्यवहार सुरू केला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याच मुद्द्यावर मुंबई येथे बोलावलेली बैठक सुरू होती. शासनावर दबाव तयार करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले जात आहे, असे स्पष्ट करीत आमदार बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्तांशी तूरखरेदीच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा केली. शेतकऱ्यांकडील तूर शासनातर्फे हमीभावात खरेदी केली जाईल, अशी बातमी दुपारी बाराच्या सुमारास वृत्तवाहिन्यांवर झळकताच आमदार बच्चू कडू यांनी घोषणा देत विभागीय आयुक्तांचे दालन सोडले. 

या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: tur issue