अकोटात तूर खरेदी घोटाळा; चाैकशीत ठपका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या तूर खरेदी घोळाची चाैकशी करण्यासाठी शेकोकार यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. त्यांचा चाैकशी अहवाल दोन-तीन दिवसांपूर्वीच प्राप्त झाला. चाैकशी अधिकाऱ्यांना यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. 
- जी.जी. माळवे, जिल्हा उपनिबंधक 

अकोट : अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडद्वारे करण्यात आलेल्या तूर खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचा ठपका सहायक उपनिंबधक अकोट यांच्या चौकशी समितीने ठेवला आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून पोलिस तक्रार करण्यात आली असून, ती चाैकशीत ठेवण्यात आली आहे. तूर खरेदीत झालेल्या अनियमिततेची तक्रार माजी सभापदी गजानन पुंडकर यांनी केली होती. 

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात झालेल्या तूर खरेदीत टोकन व पासवर मोठ्याप्रमाणावर अनियमितता झाल्याची तक्रार गजानन पुंडकर यांनी सहकार मंत्र्यांकडे केली होती. त्यावर चाैकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर अकोट येथील सहायक निबंधक सहकारी संस्था शेकोकार यांची चाैकशी समिती गठित करण्यात आली होती. या समितीने चाैकशी करून अहवाल उपनिबंधक जी.जी. माळवे यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालानुसार चाैकशी अधिकारी शेकोकार यांना कादेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार कार्यालयातील कर्मचारी गवई यांना पोलिस तक्रार करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले. त्यांनी सोमवारी या घोटाळ्याची पोलिस तक्रार केली. 

काय आहे घोटाळा? 
० बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत हमीभावात २०.३९ कोटीची तूर खरेदी 
० नाफेडचे प्रतिनिधी म्हणून तालुका खरेदी विक्री संघ व व्हीसीएमएफ कंपनी 
० एका टोकणवर एक नाव असताना प्रवेश पासवर चार ते पाच जणांची नावे 
० एका टोकणवर अनेकांची नावे दर्शवून तूर खरेदी 
० रद्द झालेल्या ४४०१ ते ४५०० या टोकणवरही पास देवू तूर खरेदी 
० १२ टोकन बूक व १२ प्रवेश पुस्तिका 
० एकूण १२०० शेतकरी अभिप्रेत असताना प्रत्यक्षात २६७४ शेतकऱ्यांकडून माल खरेदी दर्शविली 
० टॅक्टर ट्रॉलीची क्षमता ५० ते ५५ क्विंटलची असताना प्रत्यक्षात १४५ ते१६० क्विंटर भरती दाखविली. 
० एकाच टॅक्टरची एका टोकणवर दोनवेळा मोजणीची शक्यता 
०काहींना तूर विक्रीची रक्कम मिळाली, काहींचे नावे रक्कम वितरण नोंदवहीत नाही 
० प्रवेस पास व टोकण यावर नमूद तुरीच्या खरेदीच्या नोंदीत तफावत 
० ५००१ ते ५१०० हे पुस्तक तपासणीस देण्यात आले नाही 

यांच्यावर ठेवला ठपका 
तूर खरेदीत मोठ्याप्रमाणावर म्हणजे जवळपास १४७४ टोकन अवैध असून, त्यासाठी तालुका खरेदी विक्रीचे खरेदी प्रक्रियेत नियुक्त कर्मचारी, कृउबा, व्हीसीएमएफ कंपनीकडून नियमांची पायमल्ली झाल्याचा ठपका चाैकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. 

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या तूर खरेदी घोळाची चाैकशी करण्यासाठी शेकोकार यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. त्यांचा चाैकशी अहवाल दोन-तीन दिवसांपूर्वीच प्राप्त झाला. चाैकशी अधिकाऱ्यांना यासंदर्भात कायदेशीर कारवाई करून दोषींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. 
- जी.जी. माळवे, जिल्हा उपनिबंधक 

अकोट बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची लुट सुरू असून, मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. या पराक्रमात जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रेटून ठेवणार आहे. बळीराजा उपाशी व बाजार समिती मधील काही महाभाग तुपाशी असी परिस्थिती आहे. या सर्व बाबीचा पाठपुरावा करणार आहे. 
- गजानन पुंडकर, माजी सभापती, अकोट कृउबा

Web Title: tur purchase scam in Akot