हंगाम संपताच तुरीचे दर वधारले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 एप्रिल 2019

बाजारात आवक घटली
बाजारातील तुरीची आवक सध्या घटली आहे. दोन आठवड्यांत तुरीच्या दरात सरासरी दोनशे ते अडीचशे रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे खुल्या बाजारात तुरीला किमान ४ हजार ५०० तर ५ हजार ४५० कमाल भाव मिळाला. हमीभावाच्या तुलनेत हा भाव परवडणारा असला; तरी शेतकऱ्यांकडे मात्र त्या प्रमाणात तूर शिल्लक नाही. बाजारातील तुरीची आवक अतिशय मंद आहे. त्यामुळे वाढीव भावाचा कितपत लाभ त्यांच्या पदरी पडेल, हा प्रश्‍न आहे. मात्र, फेडरेशनकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या बघता वाढीव भाव लाभदायक ठरू शकेल.

अमरावती - तुरीच्या स्थिर दरात सरासरी दोनशे ते अडीचशे रुपयांनी वाढ झाली आहे. स्थानिक बाजार समितीत तुरीचे कमाल दर ५ हजार ४५० रुपयांवर पोहोचले आहेत. वाढीव दराचा लाभ मात्र शेतकऱ्यांच्या पदरी किती पडेल, हा प्रश्‍न आहे. सरासरी पाच ते सहा हजार रुपये भाव असलेल्या तिळाचे दर कडाडले असून, ते अकरा हजारांवर गेलेत.

काही वर्षांपासून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उन्हाळी तीळपेरणी सुरू केली आहे. साधारणतः मकरसंक्रांतीला तिळाचे भाव वधारतात. त्यानंतर दरात घसरण येऊन साधारणपणे सरासरी पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटलवर दर स्थिरावतात. यंदा मात्र तिळाच्या दरातील तेजी कायम आहे. तिळाला खुल्या बाजारात ११ हजार कमाल, तर ९ हजार ५०० रुपये किमान भाव मिळाला आहे. या तिळाचे पेरणीक्षेत्र अतिशय मर्यादित असून उत्पादनाची सरासरीही जेमतेम आहे.

तुरीचा हंगाम सुरू झाला, तेव्हा शासकीय खरेदीचे धोरण निश्‍चित झालेले नव्हते. त्याचा लाभ खुल्या बाजारातील खरेदीदारांनी घेतला. हमीदराच्या तुलनेत चांगला भाव दिल्याने शेतकऱ्यांचा लोंढा खुल्या बाजाराकडे वाढला.

हंगामात खुल्या बाजारात तुरीचे सरासरी ३ हजार ८०० ते ५ हजारांपर्यंत भाव स्थिर होते. दरम्यान बाजारात तुरीचे भाव कोसळल्याने शासकीय तूरखरेदीही हंगामात सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक निकडीपायी मिळेल त्या भावात तूर विकली. जानेवारीपासून तुरीच्या दरात किरकोळ वाढ होऊन कमाल दर ५,२५० वर स्थिरावला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tur Rate Increase market Committee