रेशन दुकानातून तूरडाळ गायब

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर : शासनाने रेशन कार्डधारकांना स्वस्त दरात तूरडाळ देण्याचे जाहीर केले. मात्र, शहरातील अनेक रेशन दुकानात तूरडाळच नसल्याची माहिती आहे. यामुळे गोरगरिबांसह मध्यमवर्गीयांच्या ताटातील वरण गायब झाले आहे. ऐन सणासुदीत तूरडाळ मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. शहरी भागात तूरडाळीचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजते.

मागील दोन वर्षांपासून राज्यात तूरडाळीचे बंपर उत्पादन होत आहे. यामुळे रेशन दुकानातून नागरिकांना तूरडाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूर शहरात 665 रेशन दुकाने असून, लाखावर कार्डधारक आहेत. शहराला महिन्याला 667 मेट्रिक टन तूरडाळीची गरज आहे. जानेवारी महिन्यात शासनाकडून निम्म्यापेक्षाही कमी पुरवठा झाला. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील विविध भागातील रेशन दुकानांमध्ये कार्डधारकांना गहू व तांदूळ वितरित करण्यात आले. तूरडाळीसाठी विचारण केली असता शासनाकडूनच डाळ उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात येते. दक्षिण नागपूर येथील एका रेशन दुकानदाराने तूरडाळ बंद झाल्याचे सांगितले. फक्त चणा डाळ देण्यात येते. 35 रुपये किलोप्रमाणे रेशन दुकानात केशरी व बीपीएल कार्डधारकांना एक किलो तूरडाळ उपलब्ध करून दिली जायची. त्यानंतर 55 रुपये करण्यात आली. सध्या तूरडाळ नव्वदीच्या घरात आहे. गरिबांना ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याने रेशन दुकानाकडे त्यांची धाव असते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शहरी भागात डाळीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे जास्त दराने डाळ खरेदी करावी लागत आहे. ग्रामीण भागात तूरडाळीचा पुरवठा नियमित होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. शहरात डाळ मिळत नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turbans disappear from the ration shop