esakal | सोयाबीन, कापसावर ‘हळद’ पडतेय भारी
sakal

बोलून बातमी शोधा

turmerik.jpg

पारंपरिक पिकांना फाटा देत आता अकोलेकरांनी मसाला, भाजीपाला व फळपिकांवर भर देण्यास सुरुवात केली असून, दोन वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये हळदीचा पेरा दुप्पटीने वाढला आहे.

सोयाबीन, कापसावर ‘हळद’ पडतेय भारी

sakal_logo
By
अनुप ताले

अकोला : पारंपरिक पिकांना फाटा देत आता अकोलेकरांनी मसाला, भाजीपाला व फळपिकांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यातही हळदीच्या पिकाला विशेष पसंती दर्शवित दरवर्षी हळद लागवड क्षेत्र झपाट्याने वाढत असून, प्रामुख्याने जैविक लागवडीवर भर दिला जात आहे. त्यामुळे दोन वर्षामध्ये जिल्ह्यात हळदीचा पेरा दुप्पट झाला असून, मसाला पीक उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही जोरदार वाढ झाली आहे.

जिल्ह्यात सोयाबीन, कापूस तसेच मूग, उडीद, तूर या पारंपरिक पिकाची सर्वाधिक पेरणी केली जाते. बहुदा त्यांचेपासून अधिक उत्पादन सुद्धा मिळते. मात्र, बाजारपेठेत रास्त भाव मिळत नसल्याने, पारंपरिक पिकांची शेती शेतकऱ्यांना नुकसानाची ठरत आहे. त्यामुळे या पिकांना पर्याची परंतु, अधिक मागणी असणारे, जास्त उत्पादन व उत्पन्न देणारे पीक निवड करण्याचा सल्ला कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राद्वारे सातत्याने दिला जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मसाला पीक लागवडीवर भर द्यायला सुरुवात केली आहे. त्यातही येथील हवामान व जमिनीमध्ये अधिक उत्पादन देणारे हळदीचे पीक घेतल्यास पारंपरिक पिकांपेक्षा जास्त पटीने उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे हळद लागवडीसाठी शेतकरी प्राधान्य देत असून, यावर्षी सुमारे तीनशे ते चारशे हेक्टरवर हळदीची पेरणी झाली असून, एकरी 125 ते 150 क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे.

बाजारपेठेचा अभाव ही मोठी समस्या
जिल्ह्यात हळद लागवड क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु, मिळणारे उत्पादन विक्री करण्यासाठी खात्रीची व मोठी बाजारपेठ जिल्ह्यात उपलब्ध नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना हळद विक्रीची मोठी समस्या भेडसावत असून, उत्पादीत हळद विक्रीसाठी त्यांना वाशिम जिल्ह्यातील रिसोड व मराठवाड्यात हिंगोली तसेच साताऱ्यातील वाई, सांगली येथील बाजारपेठ गाठावी लागत आहे.

शेतकरी बनला उद्योजक
जिल्ह्यात केवळ हळद उत्पादन घेण्यावर शेतकरी थांबला नसून, बहुतांश ठिकाणी, प्रामुख्याने ग्रामीण भागात, शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, वयक्तिक स्वरुपात व बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी हळकुंडांपासून गुणवत्तापूर्ण हळद पावडर निर्मिती सुरू केली आहे. त्यापासून त्यांना हळकूंड विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा तिप्पट उत्पन्न मिळत आहे.

‘हळदी’च्या या वाणांची लागवड
अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी शिफारसीत फुले स्वरूपा, सेलम, कृष्णा, राजापुरी, पीडीकेव्ही वायगाव, भारतीय मसाले संशोधन केंद्र कलिकत (केरळ) यांनी संशोधित केलेली ‘प्रगती’ (5.07 टक्के कुरकुमीन) इत्यादी प्रमुख वाणांची प्रामुख्याने लागवड जिल्ह्यासह वऱ्हाडात होत आहे. त्यापैकी जवळपास 95 टक्के लागवड सेलम वाणाची होत असून, त्या खालोखाल पीडीकेव्ही वायगाव व काही ठिकाणी ‘प्रगती’ची लागवड झाली आहे.

हळद पिकाचे फायदे
* वन्य प्राण्यांचा त्रास नाही.
* पारंपरिक पिकांच्या तुलनेत भाव अधिक मिळतो.
* कमी दिवसात, कमी जागेत जास्त उत्पादन मिळते.
* कीड, रोगाचा प्रादूर्भाव कमी.

कृषी विज्ञान केंद्र देतेय प्रोत्साहन
हळदीच्या पिकापासून भरपूर उत्पादन मिळत असल्याने, जिल्ह्यातील पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा या तालुक्यात हळदीचे क्षेत्र जवळपास दुपटीने वाढले आहे. त्यानुसार यावर्षी तीनशे ते चारशे हेक्टरवर लागवड झाल्याची शक्यता आहे. कृषी विज्ञान केंद्राकडूनही शेतकऱ्यांना हळद लागवड व हळद उत्पादन आधारित प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन दिले जात आहे.
- गजानन तुपकर, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र अकोला.

loading image