वृक्षारोपणाने गाठला चोवीस कोटींचा आकडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

नागपूर ः हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत 33 कोटी वृक्षलागवड करण्यात येत असून, राज्यात 12 जुलैपर्यंत 23 कोटी 97 लाख 15 हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. एक जुलैपासून ही मोहीम राज्यात राबविण्यात येत असून लातूर, मुंबई आणि परभणी जिल्ह्यात सर्वांत कमी वृक्षांची लागवड झालेली आहे.

नागपूर ः हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत 33 कोटी वृक्षलागवड करण्यात येत असून, राज्यात 12 जुलैपर्यंत 23 कोटी 97 लाख 15 हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. एक जुलैपासून ही मोहीम राज्यात राबविण्यात येत असून लातूर, मुंबई आणि परभणी जिल्ह्यात सर्वांत कमी वृक्षांची लागवड झालेली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात तीन वर्षांत 50 कोटी रोपे लावण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. त्याअंतर्गत 1 जुलै ते 31 सप्टेंबरपर्यंत 33 कोटी रोपे लावली जाणार आहेत. यात वन विभागासह इतर शासकीय व निमशासकीय विभाग, शैक्षणिक संस्था व नागरिकांची मदत घेऊन हे लक्ष्य पूर्ण केले जात आहे. आजपर्यंत 23 कोटी 77 लाख 15 हजार 571 रोपांची लागवड झाली आहे. त्यात 62 लाख 46 हजार 84 लोकांनी सहभाग घेतला आहे.
राज्यातील कोल्हापूर, मुंबई उपनगर, गडचिरोली, जळगाव या जिल्ह्यांत 80 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक रोपांची लागवड झालेली आहे. वन विभागाचे मुख्यालय असलेल्या नागपूर जिल्ह्यात फक्त 59 टक्के ऐवढी रोपे लावण्यात आलेली आहे. राज्यात आतापर्यंत दिलेल्या उद्दिष्टापैकी 69 टक्के रोपांची लागवड झालेली आहे. विदर्भासह मराठवाड्यात पावसाने दडी दिल्याने गेल्या महिन्याच्या अखेरपर्यंत फक्त 30 टक्‍क्‍यापेक्षा कमी वृक्षांची लागवड झालेली होती. पंधरा दिवसांत सततच्या पावसामुळे वृक्षारोपणावर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे टक्केवारी वाढलेली असताना कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, पुणे, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे. या परिसरातील अनेक भागांतील रोपे वाहून गेलेली आहेत. त्यामुळे त्या परिसरात सध्या 80 टक्के रोपांची लागवड झालेली डॉशबोर्डवर दिसत असली तरी महापुराचा फटका बसला आहे. त्यामुळे त्या रोपांची लागवड करणे हे पुन्हा नवे आव्हान सर्वच विभागांसमोर उभे ठाकले आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या दिलेल्या मुदतीत 33 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट्य पूर्ण झाल्याचे डॉशबोर्डवर दिसेल. प्रत्यक्षात जिवंत रोपांचे प्रमाण 20 टक्‍क्‍यांवर येण्याची शक्‍यताही वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा रोपण करणे हे मोठे आव्हान भविष्यात राहणार असल्याचेही बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty-four crores reached the plantation