जुळ्या बहीण-भावाचे प्रथमच मतदान

जुळ्या बहीण-भावाचे प्रथमच मतदान

नागपूर : पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणाईत सर्वच मतदान केंद्रांवर उत्साह दिसून आला. यात दक्षिण नागपुरात साक्षी व सुयश महाकाळकर या जुळ्या बहीण-भावाने आज प्रथमच मतदान केले. मात्र, मतदार यादीत नावाचा समावेश करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतरही नाव न आल्याने अनेक तरुणाईची निराशाही झाली. 
शहरातील सहाही मतदारसंघांतील 2049 मतदार केंद्रांवर आज मतदान झाले. शहरात मतदान केंद्रापर्यंत पोहोचलेल्या सर्वच मतदारांत उत्साहाचे चित्र होते. पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी आलेल्या तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर लागलेल्या रांगांमध्ये तरुणाईचा समावेश अधिक होता. यातील काही तरुणांनी देशाचे सरकार निवडल्यानंतर राज्यातील सरकार निवडून देण्यासाठी पहिल्यांदाच मतदान केले. काही तरुणांचे एकूणच पहिले मतदान होते. यात साक्षी व सुयश या महाकाळकर जुळ्या बहीण-भावाचा समावेश आहे. साक्षी व सुयश कॉंग्रेस नगरसेवक संजय महाकाळकर यांची मुले आहेत. दोघेही पुण्याला शिक्षण घेत आहेत. पहिल्यांदा मतदानाची संधी असल्याने दोघेही काल, रविवारी नागपुरात आले. आज दोघांनीही आई-वडिलांसह सक्करदरा येथील मोहता सायन्स कॉलेजमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 

मतदान करण्यासाठी आतुर 
देशाचे सरकार निवडल्यानंतर आज पहिल्यांदाच राज्यात सरकार निवडण्यासाठी मतदान केले. प्रत्येक तरुणाने मतदान हक्‍क बजावण्याची गरज आहे. विधानसभेसाठीही मतदान केल्यानंतर आता महापालिकेसाठी मतदान करण्यासाठी आतुर आहे. 
- श्रद्धा दुरुगकर, इंदिरा गांधी शाळा, सुभेदार ले-आउट मतदान केंद्र. 

कर्तव्य पार पाडल्याचा आनंद 
मी आज पहिल्यांदाच मतदान केले. मतदान करीत मी माझे कर्तव्य पार पाडले, याचा मोठा आनंद आहे. चांगल्या सरकारसाठी प्रत्येक तरुणाने मतदान केले पाहिजे. मी मतदान कुणाला करायचे, याचा निर्णयही मीच घेतला. अर्थातच आई-वडिलांनी स्वतः निर्णय घेण्यास सांगितले. 
- श्रद्धा गिरी, नवप्रतिभा हायस्कूल, आयुर्वेदिक ले-आउट मतदान केंद्र 

नोटाचा वापर करू नये 
मी आज लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदान केले. सर्वांनीच मतदान करण्याची गरज आहे. जनतेच्या समस्या जाणणाऱ्या, चांगल्या आणि योग्य उमेदवाराला संधी दिली पाहिजे. कुणीही नोटाचा वापर करू नये. 
- सुनील ढोक, लॉ कॉलेज, दिघोरी मतदान केंद्र 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com