व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी देऊन मुलीकडून उकळले अडीच लाख  

संतोष ताकपिरे 
Thursday, 29 October 2020

प्रथमेशच्या दहशतीखाली आल्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीने वेळोवेळी प्रथमेशने केलेली पैशाची मागणी पूर्ण करण्यासाठी आईला माहिती न करता तिच्या बॅंकखात्याचा वापर केला. 

अमरावती : मोर्शी परिसरात एका अल्पवयीन मुलीचे अश्‍लील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एकाने तिच्याकडून चक्क 2 लाख 40 हजारांची खंडणी वसूल केली.

प्रथमेश सुधीर टवलारे (वय 19), असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव असल्याचे मोर्शीचे पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी सांगितले. न्यायालयाने प्रथमेशला शनिवारपर्यंत (ता.31) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रथमेशच्या दहशतीखाली आल्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीने वेळोवेळी प्रथमेशने केलेली पैशाची मागणी पूर्ण करण्यासाठी आईला माहिती न करता तिच्या बॅंकखात्याचा वापर केला. 

या अल्पवयीन मुलीसोबत बोलताना संशयित आरोपी प्रथमेश व्हिडिओ कॉलचा वापर करायचा. तिचे काही व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केले होते. हे अश्‍लील व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची सतत धमकी देऊन प्रथमेशने पीडित मुलीचे तिच्या घरी जाऊन काही दिवसांपासून लैंगिक शोषण सुरू केले. 21 सप्टेंबर 2020 ते 25 ऑक्‍टोबर 2020 या एक महिन्याच्या कालावधीत तब्बल अकरा वेळा पीडित मुलीकडून प्रथमेशने दोन लाख चाळीस हजार रुपये एवढी रक्कम उकळली. 

हेही वाचा - ‘मला कोरोना झाला असून, लास्ट स्टेजवर आहे’ असे म्हणत केला विश्वासघात
 

प्रकरण अंगलट येईल या भीतीने प्रथमेशने पीडित मुलीच्या चुलत भावाच्या बॅंक खात्यामध्ये हडपलेल्या रकमेपैकी 52 हजार रुपये परत केले. पीडितेच्या कुटुंबातील काही सदस्यांना घटनेची माहिती मिळाली. पीडितसुद्धा प्रथमेशकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळल्याने तिने मोर्शी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी प्रथमेश टवलारेविरुद्ध अत्याचार, खंडणीसह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. 
 

आईच्या बॅंकखात्याचा वापर 

आपली बदनामी टाळण्यासाठी पीडितेने आईच्या बॅंक खात्यामधून गुगल पे अकाउंटवरून संशयित त्या युवकाला पैसे पाठविल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली.
 

सत्य बाहेर येईल
महिला अत्याचाराशी संबंधित प्रकरण आहे. शिवाय पीडित ही अल्पवयीन असल्याने त्याची तातडीने दखल घेऊन पुढील प्रक्रिया पार पाडली. तपासात तथ्य बाहेर येईल.
-संजय सोळंके, पोलिस निरीक्षक, मोर्शी.

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two and a half lakh taken from the girl by threatening to make the video viral