नकली नोटा देणाऱ्या दोन ठगांना अटक

नकली नोटा देणाऱ्या दोन ठगांना अटक

नागपूर - चलनातून बाद झालेल्या नोटा बदलवून देण्याचे आमिष दाखवून मनोज दशरथ जरेले (35, रा. कुशीनगर) याची फसवणूक करण्यात आली. जरीपटका पोलिसांनी राजेंद्र भय्यालाल नशिने व हेमंत भक्‍ते (दोन्ही रा. रामाकोना, मध्य प्रदेश) यांना अटक केली. 

जरेले याच्याकडे चलनातून बाद झालेल्या पाचशेच्या नोटा होत्या. बाद झालेल्या नोटा बदलवून मिळतात, अशी माहिती कुणीतरी जरेलेला दिली व आरोपींचा क्रमांकही दिला. जरेलेने राजेंद्रसोबत संपर्क साधला व नोटा बदलवून देण्याची विनंती केली. शुक्रवारी दोन्ही आरोपी नागपूरला आले व सीताबर्डीतील अपना लॉजमध्ये थांबले. त्यानंतर आरोपींनी जरेलेसोबत संपर्क साधून कामठी मार्गावरील लाल गोदामाजवळ बोलविले. जरेलेने त्यांना चलनातून बाद झालेल्या पाचशेच्या 20 नोटा दिल्या. त्यावर आरोपींनी जरेलेला शंभरचे दोन बंडल दिले. आणखी नोटा बदलवायच्या असतील, तर सीताबर्डी येथे भेट, असे सांगून निघून गेले. 

जरेलेने बंडल उघडले असता वर व खाली असली नोटा होत्या. मात्र, आतमध्ये चिल्ड्रन मनोरंजन बॅंकेच्या खेळण्याच्या नोटा होत्या. लगेच त्याने जरीपटका पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. पोलिसांनी जरेलेला आरोपींशी संपर्क करायला सांगितले. त्यानुसार, राजेंद्रसोबत संपर्क करून आणखी नोटा बदलवायच्या आहेत, असे सांगितले. आरोपींनी त्याला सीताबर्डी येथे येण्यास सांगितले. पोलिस पथकासह जरेले सीताबर्डी येथे गेला आणि राजेंद्रची भेट घेतली. तोच पोलिसांनी त्याला पकडले. विचारपूस केली असता साथीदार अपना लॉज येथे थांबल्याचे सांगितले. 

पोलिसांनी लॉजची झडती घेत हेमंत भक्ते पकडले. लॉजमधून पोलिसांना नकली नोटांचे 22 बंडल मिळाले. त्याचप्रमाणे आरोपींजवळ 90 हजार रुपये मिळाले. पोलिसांनी पैसे आणि मोबाईलसह 97 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना न्यायालयात हजर करून सहा नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com